लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : पूर्वी एसटी, दुकानात व बँकांमध्ये सुटे पैशांची कमतरता भासत. सुटे पैसे नसल्यामुळे प्रसंगी वादाचे प्रसंग घडत. आता परिस्थिती बदलत असून, चलनात भरमसाठ नाणी असल्याने, हा अतिरिक्त भार खिशात ठेवण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ‘चिल्लर नको रे बाबा’ हे कटुसंवाद ऐकावयास मिळत आहेत.
दुकानात सुट्या पैशांची विशेषतः एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यांची कमतरता भासायची. फार पूर्वी सुट्या पैशासाठी वणवण फिरावे लागायचे. काही वेळा शंभर रुपयांमागे दहा रुपये कमिशन द्यावे लागायचे. काही वेळेला बँक कर्मचाऱ्यांकडे वशिला लावावा लागायचा. पिग्मी एजंटकडे मोठ्या रकमेची पावती करतो, पण त्या बदल्यात सुटी नाणी देत जा, असा तगादा असायचा. सुट्या पैशांची ओढाताण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वी एक, दोन, पाच, दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आणली. त्यामुळे सुट्या पैशांची समस्या सुटली. नोटांपेक्षा नाण्यांचा भडीमार चलनात जाणवू लागला. दहा रुपयांचा ठोकळा वजनदार असल्याने, तो घेण्यास काहींची मानसिकता होत नाही. काही वर्षांपूर्वी नव्याने चलनात आलेली नाणी अशीच पडून राहतात. कारण कोरोना काळात नाण्यांची देवाण-घेवाणतून संसर्गाची भीती व्यक्त होत होती. प्रसंगी व पर्यायच नसल्याने ही नाणी स्वीकारून त्यावर आजही सॅनिटायझरची फवारणी होत आहे.
सुट्या पैशांचा भार सोसवत नसल्याने ठिकठिकाणी नाणी घेण्यास नकार दिला जात आहे. सद्य:स्थितीत बँका व दुकानात नाणी मोठ्या प्रमाणात जमा आहेत. जिथे तिथे सुटे पैसे नकोच असे बोलले जात आहे.
चौकट
दानपेटीत नाणी टाकणे बंद....
मंदिराच्या दानपेटीतही दहा, वीस, पन्नास व शंभराच्या नोटा मोठ्या प्रमाणात टाकल्या जात आहेत. पूर्वी दानपेटीत एक, दोन व पाच रुपयांची नाणी टाकली जात. त्यावेळी सुट्या पैशांची ओढाताण असायची, त्यावेळी व्यापाऱ्यांकडून मंदिर व बँकांकडून नाण्यांची मागणी जादा होती. मात्र, नाण्यांची उलाढाल जादा झाल्याने मंदिरातील दानपेटीतही भाविक नोटा अर्पण करत आहेत.
प्रतिक्रिया
एक, दोन, पाचची नाणे जवळ बाळगण्यास काही वाटत नाही. मात्र, बँकांनी दहा रुपयांचे नाणे चलनात आणले. नाणे आकाराने मोठे व वजनदार असल्याने, त्याचा अनेक जणांना भार वाटू लागला आहे. ग्राहक शंभर रुपयांची वस्तू खरेदेसाठी दहा रुपयांची दहा नाणी घेऊन येतात. तेव्हा नाईलाजाने नोटांचा आग्रह करावा लागतो.
- राहुल घोरपडे, व्यापारी, वडूज.
प्रतिक्रिया
नाणी खिशात अथवा पर्समध्ये बाळगणे कठीण झाले आहे. अनेक दुकानदार नाणी स्वीकारत नाहीत. त्यात दहा रुपयांचे नाणे सहजासहजी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे बँकांनी चलनातून रद्द करायला हवे.
- आसिफ मुल्ला, महाविद्यालयीन विद्यार्थी, वडूज.