कऱ्हाड : इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि नवा इतिहास घडवू शकतील अशी पुढची पिढी तयार व्हावी म्हणून ‘लोकमत बालविकास मंच’ व कऱ्हाड अर्बन स्पोर्टस् क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या इतिहासाला उजाळा देणे ही काळाची गरज आहे. दिवाळीचा सण साजरा करत असताना किल्ले बनविण्याची परंपरा हा इतिहासाला उजाळा देण्याचाच एक भाग मानला जातो. परंतु अलिकडच्या गतिमान आणि विज्ञान युगामध्ये मनोरंजन आणि खेळाची नवनवीन साधने मुलांच्या हातात पडल्याने दिवाळीतील किल्ले बनविण्याची संख्या कमी होतेय की काय अशी भीती निर्माण होतेय. महाराष्ट्राच्या भूगोलाला छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्त्वाचा मोठा इतिहास आहे. रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड असे महाराष्ट्रात सुमारे ३00 ते ३५0 किल्ले विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभे आहेत. सातारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. छत्रपतींच्या थेट वारसाची गादीही सातारचीच. या सातारा जिल्ह्यात दुर्गभ्रमण करणारे आणि इतिहास जागविणारेही कमी नाहीत. पण अलीकडच्या काळात ऐतिहासिक स्थळे ही पर्यटन स्थळे न राहता हनिमुनची ठिकाणे बनताहेत की काय अशी परिस्थिती पहावयास मिळते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीला पटवून सांगणे ही काळाची गरज आहे. शिवकाळात किल्ल्यांवर दीपावली सण साजरा केला जात होता. त्यावेळी मशालींच्या झगमगाटात किल्ले उजळून निघायचे. या संस्कृतीचे जतन नंतरच्या काळात छोटे किल्ले बनवून दिवाळीच्या निमित्ताने केले जावू लागले. आम्हीही जणू शिवरायांचे मावळे आहोत. या भावनेने छोटे छोटे हात एक एक दगड रचून किल्ले बनवू लागले. त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागण्यासाठी बळ मिळू लागले. पण अलीकडच्या काळात सुट्टीमध्ये वेगवेगळे खेळ खेळणारी साधने मुलांच्या हातात आली आणि मातीवरती प्रेम करा हे सांगायला माताही विसरली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आज दिवाळीतील छोटे किल्ले कमी प्रमाणात दिसू लागले आहेत. परिणामी किल्ला बनविताना मुलांच्या कल्पकतेला वाव देणारी प्रयोगशाळा बंद होतेय की काय अशी शक्यता वाटते. खरे तर मातीत बनविलेल्या किल्ल्यांवर मातीनेच तयार केलेले छोटे छोटे सैनिक जेव्हा मांडले जातात. तेव्हा या मातीबद्दल त्या मुलांच्या मनामध्ये आस निर्माण होते. मात्र, अलिकडच्या काळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलांच्या विश्वात देशी, मैदानी खेळांपेक्षा व्हिडीओ गेम्स, टी. व्ही. कार्टून्स यांचे मायावी जाळे अफाट पसरले आहे. त्यामुळे मुले तासनतास या मायावी जाळाच्या संपर्कात असतात. अशा परिस्थितीत रोजची शाळा, क्लासेस, टी. व्ही. वरील कार्टून्स व पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षांमुळे मुलांचे मातीत खेळण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. मुलांच्या शारीरिक विकास खुंटत चालला आहे ही चिंतेची बाब आहे. (प्रतिनिधी) ‘लोकमत बालविकास मंच’ व ‘कऱ्हाड अर्बन स्पोर्टस् क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ७ नोव्हेंबरपासून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि. ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत किल्ला स्पर्धा होणार असून, दि. १0 ते १४ या कालावधीत किल्ले पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. एस. एम. एस. इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये ही स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. दहावी पर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. नाव नोंदणीसाठी कऱ्हाड अर्बन स्पोर्टस् क्लबचे दिलीप चिंचकर मो. ९८५00४२४४४ व जगदीश त्रिवेदी ८३७८९९२१५४ यांच्याशी संपर्क साधावा.रेडिमेडच्या जमान्यात किल्लेही रेडिमेडआजचा जमाना फास्टफूड व रेडिमेडचा आहे. मुलांनी घरी आईकडे एखाद्या खाद्यपदार्थाची मागणी केली असता. तो पदार्थ दोन मिनीटात मुलाला मिळतो. अशी कोणतीच वस्तू नाही की, जी मुलांना मिळत नाही. त्यामुळे मुलांना या सगळ्यांची किंमत कधी कळणार हा प्रश्न आहेच. पण आता रेडिमेडच्या जमान्यात किल्लेही रेडिमेड मिळू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी गडकोट किल्ले उभारण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम आजच्या या मुलांना कधी कळणार.
कऱ्हाडात ‘चला किल्ले बनवूया’ स्पर्धा
By admin | Updated: November 5, 2015 00:11 IST