भुर्इंज : वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जलसंधारण समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते दिलीप बाबर यांनी किसन वीर कारखान्यावरील कार्यक्रमाला हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर याच कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी बाबर यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन व कृषदिनानिमित्ताने ‘ऊस पीक’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, माजी खासदार गजानन बाबर, प्रल्हाद चव्हाण, साहेबराव पवार, शंकरराव पोळ, धनंजय चव्हाण, बाळासाहेब धुमाळ, चंद्रकांत चव्हाण, महादेव मांढरे, भैय्यासाहेब जाधवराव, बाळासाहेब कांबळे, कार्यकारी संचालक विजय वाबळे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बाबर आणि बाबा खुडे यांनी लावलेली उपस्थिती सर्वांनाच धक्का देणारी ठरली. कारण दिलीप बाबर हे मकरंद पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना आमदार पाटील यांचे जवळचे म्हणून मतदारसंघात ओळखले जाते. त्याचबरोबर खुडे यांचा आमदार पाटील यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. ते राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. या दोघांची उपस्थिती सर्वांचीच लक्ष वेधणारी ठरली. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी बाबर यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. कार्यक्रमानंतरही आ. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भोसले यांच्या गटात उडी मारल्याचीच चर्चा जोरात सुरू होती. (वार्ताहर)
मकरंद पाटलांचे कार्यकर्ते मदन भोसलेंच्या कार्यक्रमात
By admin | Updated: July 2, 2014 00:26 IST