बामणोली : राज्यभरातून कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, फुलांचा हंगाम सुरु होण्यास वेळ असूनही आताच पर्यटकांकडून दहा रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. याबाबत पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.स्वातंत्र्यदिन, शनिवार, रविवार व पतेती अशा चार दिवस सलग सुट्या आल्याने कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे, मुंबईच्या पर्यटकांची पावले ठोसेघर, कास-बामणोलीकडे वळली. साताराहून-कास बामणोलीला जाणारा मुख्य रस्ता हा कास पठारावरूनच पुढे जातो. याचाच फायदा घेत कास-पठारावरील वनकमिट्या व वनविभागाने पर्यटकांकडून शुल्क वसुली केली जाते. २०१२ मध्ये वसूल केलेला निधी कास, कासाळी, आराळी, एकीव या गावांनी गॅस कनेक्शन व सौरऊर्जा घेऊन खर्च केला; परंतु मागील वर्षीचा म्हणजेच, २०१३ चा सुमारे पंधरा लाखांचा निधी आजअखेर खर्च केलेला नाही. यावर्षी तर या वनकमिट्यांनी वनविभागाच्या सहकार्याने जुलै महिन्यातच शुल्क वसुली भरावी लागत आहे. सध्या पठरावर फक्त गवत असून, फुलांचा हंगाम सुरू होण्यास अजूनही १० ते १५ दिवसांचा अवधी आहे. बामणोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांना अडवून त्यांच्याकडून सक्तीने शुल्क वसुली केली जात आहे. पर्यटकांना कंपाउंडच्या आत साडले जात आहे. परंतु, पर्यटकांना पठरावरील हिरवेगार गवत पाहूनच नाराज होऊन परत फिरावे लागत आहे. त्यामुळे परत येऊन पर्यटक फुले नसल्याने शुल्क वसुली कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालत आहेत. (वार्ताहर)
बिनफुलांचे पठार पाहा... दहा रुपयांत!
By admin | Updated: August 18, 2014 23:40 IST