वडूज : वादळी पावसाने पेडगाव रस्त्यावरील फिनिक्स बालसुधारगृहाच्या इमारतीवरील सर्व पत्रे उडून गेले. उन्हाळ्याची सुटी असल्याने बालसुधारगृहात विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वार्याने लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या वादळी पावसात तहसील कार्यालयात सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू असणार्या इमारतीवर वीज पडल्यासारखा जोरदार आवाज होऊन संकणक व इतर विद्युत साहित्य जळून खाक झाले तर जोरदार वार्याने पेडगाव रस्त्यावरील फिनिक्स आॅर्गनायझेशनच्या बालसुधारगृहाच्या इमारतीवरील सर्व पत्रे उचकटून पडले आहेत. वारा व पावसामुळे कार्यालयातील आठ संगणक, सहा पंखे, कपाट व इतर फर्निचरची हानी होऊन सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय मुलांच्या आहारासाठी साठविलेले २० क्विंटल गहू, ४ क्विंटल तांदूळही खराब झाला आहे. याशिवाय रानमाळ्यातील लक्ष्मण बोराटे यांच्या कलमी आंब्याचे नुकसान झाले आहे. तलाठी अभय शिंदे यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, वार्यामुळे वीजवितरण कंपनीचे २० ते २५ खांब पडल्यामुळे अनेक तास वीज गायब झाली. याशिवाय भुरकवडी-वडूज रस्त्यावरही जुनाट वृक्ष उन्मळून पडला आहे. (प्रतिनिधी)
बालसुधारगृहावरील पत्रे वार्याने उडाले
By admin | Updated: May 21, 2014 17:36 IST