अप्रतिम आणि दुर्मीळ कलाकृतींचा खजिना असलेल्या औंधच्या वस्तुसंग्रहालयाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. साहित्य आणि कलेचा वारसा जपणाऱ्या या संस्थानातील कलाप्रेमी राजा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी कलेवरील प्रेमापोटी आपल्या पदरी अनेक कलावंतांना ठेवून त्यांच्या कलेची कदर केली.
स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्या संस्थानात लोकशाहीचा प्रयोग राबविणाऱ्या आणि संपूर्ण जगाला सूर्यनमस्काराचे धडे देणाऱ्या या संस्थानाची ख्याती आहे. या अनमोल कलाकृतींचा खजिना जतन करण्यासाठी मूळपीठ डोंगराच्या मध्यावर १९३८ मध्ये बांधलेल्या इमारतीत अप्रतिम कलाकृती जतन केल्या आहेत. श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त व संस्थानाचा वारसा चालविणाऱ्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी आपल्या पूर्वजांनी जतन केलेल्या अनमोल कलाकृतींचा खजिना सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
देशी आणि विदेशी कलातपस्वींच्या हस्तकलेतून साकार झालेल्या अप्रतिम कलाकृती, दुर्मीळ वस्तू आणि अनमोल ग्रंथांचा खजिना अन् बालगोपाळांना हवेहवेसे वाटणारे येथील वातावरण मुख्य वैशिष्ट्य आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे संग्रहालयाची विस्तारित इमारत, जुन्या इमारतीची गळती काढणे, रंगरंगोटी, जलकुंभ, वाहनतळ व्यवस्था यांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे संग्रहालयाचे नवीन रूप पाहण्यासाठी येथे पुन्हा गर्दी होऊ लागली.
सुरुवातीलाच बाळासाहेब पंतप्रतिनिधी महाराजांचे जुने छायाचित्र, संगमरवरी शिल्पाची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या दालनात पंतप्रतिनिधी घराण्यातील व्यक्तिचित्रे, दुसऱ्या दालनात कोट्याळकर यांची पौराणिक चित्रे, नंतर पाश्चात्त्य चित्रकारांची चित्रे पर्यटकांना मोहिनी घालतात. पाचव्या क्रमांकाच्या दालनात बाळासाहेब पंतप्रतिनिधींबरोबर अप्पासाहेब पंत यांनी भेट दिलेल्या वस्तू पाहता येतात. पॅसेजमध्ये निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे आहेत. गॅलरीमध्ये महाराष्ट्र स्कूल, जयपूर, रजपूत स्कूल, आदी चित्रे लावण्यात आली आहेत.
नवीन इमारतीत अलीकडच्या काळातील चित्रकारांना व त्यांच्या कलेला स्थान देण्यात आले. यामध्येसुद्धा मदन माजगावकर, ए. टी. देशमुख, सागर गायकवाड यांच्या कलेला स्थान दिले आहे. दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे आणि पर्यटकांच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यंदा जवळपास तब्बल ८५ हजार पर्यटकांनी औंध वस्तुसंग्रहालयास भेट दिली असून, नव्याने प्रदर्शित करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये एकूण १८ गॅलरीज, दोन मँगनीज फ्लोअर, सुरक्षा कक्ष, भांडारगृह अशा एकूण ३२ विभागांमध्ये प्रदर्शन करण्यात आले आहे. संग्रहालय आवारात बगिचात सुधारणा करून येणाऱ्या पर्यटकांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे.
शब्दांकन : हणमंतराव शिंदे
/ राजेंद्र माने
संकलन : रशीद शेख