शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

हात बंद असताना महागाईनं पसरलं पाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कारण, वर्षभरात पेट्रोल लिटरला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कारण, वर्षभरात पेट्रोल लिटरला सरासरी २१, तर खाद्यतेल ५० रुपयांनी वाढलंय. त्याचबरोबर सिलिंडर, बांधकाम साहित्य दराची घोडदौड सुरूच आहे. कोरोनामुळे एकीकडे रोजगार कमी झाला, हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले; पण दुसरीकडे मात्र महागाईने पाय पसरल्याचे दिसून येत आहे.

देशात मागील एक वर्षाहून अधिक काळापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. या संकटाने कोणालाही सोडलेले नाही. सातारा जिल्ह्यात तर सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या कोरोनाचा सर्वच घटकांना फटका बसला आहे. व्यवसायांवर परिणाम झाला, सामान्यांची कामं बंद पडली, छोट्या विक्रेत्यांना तर दुकानांना टाळं लावावं लागलं. त्यातच इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. यामुळे महागाई आगीत तेल ओतण्याचेच काम करत आहे. त्याचबरोबर कोरोना संकटाचा आयात-निर्यातीवर परिणाम झालाय. यामुळे पाश्चात्त्य देशांनी कर वाढविल्याने खाद्यतेलालाही महागाईची फोडणी बसलीय. त्यामुळे सामान्यांच्या घरात महागाईचंच बोलणं उरलंय.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात पेट्रोलचा लिटरचा दर ७७.९५ पैसे होता, तर आता पेट्रोलला ९९ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गतवर्षी डिझेलला लिटरला ६६.८४ दर होता. आता ९० रुपये लिटरवर पोहोचले आहे. यावरून अवघ्या वर्षभरात पेट्रोल २१, तर डिझेलमागे सरासरी २३ रुपये वाढ झाली आहे. या इंधनवाढीवरही महागाईचं गणित बहुतांशी अवलंबून आहे. कारण, आज यंत्राच्या साहाय्यानं शेतीची कामं करायची झाली तर एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्याचबरोबर शेतमाल बाजारपेठेत घेऊन जायचं झालं तरी भाड्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ दूर आहेत.

खाद्यतेलामुळे तर महागाईला कडकच फोडणी मिळालीय. कारण, वर्षभरापूर्वी खाद्यतेलाच्या लिटरच्या पिशवीचा दर ८० ते १०० रुपयांदरम्यान होता. आता तो १८० पर्यंत पोहोचलाय. शेंगदाणा, सूर्यफूल तेलाला लिटरला १७० ते १८० मोजावे लागत आहेत, तर सोयाबीन तेलाचा दर १४५ पर्यंत पोहोचलाय. याला कारण म्हणजे देशात ७० टक्के तेल आयात होते. पाश्चात्तय देशांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढवलाय. यामुळे सहा महिन्यांपासून खाद्यतेल महागच होत चाललंय.

घराचं बांधकाम करायचं झालं तर बजेटमध्ये दररोज वाढच होत चाललीय. कारण, स्टील, सिमेंट, वाळू यांचे दर गगनाला भिडू लागलेत. सध्या स्टील ५५ हजार रुपये टन आहे, जे सात महिन्यांपूर्वी ४३ हजारांपर्यंत होते. त्याचबरोबर सिमेंटच्या पोत्याचा दर ३९० पर्यंत पोहोचलाय. वाळू तर मिळेनाशी झालीय. गेल्यावर्षीपर्यंत ४ ते ५ हजारांपर्यंत वाळूला ब्रासला भाव होता. आता चांगल्या वाळूचा दर ८ ते १० हजारांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे बांधकामं करायची झाली तर वाढत्या दराला तोंड द्यावं लागतंय. कारण, बांधकाम साहित्य दरात १५ ते २० टक्के वाढ आहे.

कोरोनामुळे कामं बंद पडत आहेत. सामान्यांना घरात बसून दिवस ढकलावे लागतात. पोलिसांच्या भीतीने हातगाडीधारक गल्लीबोळात जाऊन साहित्य विक्री करत जगण्याची धडपड करत आहेत. अशा काळात महागाई हातपाय अधिकच पसरू लागली आहे.

चौकट :

सिलिंडरमागे २२५ रुपये

वाढविले; १० केले कमी..

सामान्यांचा किचनशी फार मोठा संबंध. किचनशी संबंधित गोष्टी आटोक्यात तर सामान्यांना ‘अच्छे दिन’. यामध्ये सिलिंडर टाकी महत्त्वपूर्ण ठरते; पण गेल्या वर्षभराचा विचार करता सिलिंडर टाकीचा दर जवळपास २२५ रुपयांनी वाढला आहे. यामध्ये फक्त एकदाच तेही दीड महिन्यांपूर्वी १० रुपये कमी केले होते. सध्या टाकी ८२० रुपयांच्या पुढे आहे.

................

कोट :

भारतात गेल्या सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढू लागले आहेत. याला कारण म्हणजे देशात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. पाश्चात्त्य देशांनी कोरोनामुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढविला. त्यामुळे आपल्याकडे महागाई दिसून येत आहे. यापुढेही खाद्यतेलाच्या दरात तेजीच राहणार आहे.

- संभाजी अगुंडे, खाद्यतेल विक्री प्रतिनिधी

.........................

घराचं बांधकाम करायचं आहे; पण सध्या वाळू मिळेनाशी झाली आहे. जो देणार आहे तोही एका ब्रासला ६ हजार रुपये मागतोय. त्यातच इतर बांधकाम साहित्याचं दरही वाढले आहेत. त्यामुळे नवीन बांधकाम करणं महागच होत चाललंय.

- प्रल्हाद आटपाडकर

...............................................................................