सागर गुजर ल्ल साताराठरवून क्षेत्र निवडायचं आणि त्यातच करिअर करायचं, हे मोजक्याच लोकांच्या बाबतीत घडतं. त्यासाठी लागते ती जे काय करायचंय त्याबद्दलची श्रद्धा आणि अफाट प्रयत्न! साताऱ्याचे जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांनी हेच काम एका व्रताप्रमाणे अंगीकारले. वडिलांची इच्छा होती, त्यांनी पोलिस व्हावे, पण त्यांना वेध लागले होते, कृषी अधिकारी होऊन निर्णय प्रक्रियेत जायचे! हे ध्येय त्यांनी साध्य केलंय. अगदी मनात आले ते केले; आयुष्यभराचे समाधान मिळाले, असे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवत राहिले. फलटण तालुक्यातील साठेफाटा हे जितेंद्र शिंदे यांचे मूळ गाव! घरची अडीच एकर शेती. मात्र केवळ शेतीवर अवलंबून न राहता, नोकरीच्या माध्यमातून कुटुंब सावरण्यासाठी जितेंद्र शिंदे यांचे वडील पांडुरंग शिंदे यांनी मुंबईत पोलिस दलात सेवेसाठी दाखल झाले. पत्नीसह चार मुले असे मोठे कुटुंब मुंबईतल्या पोलिस वसाहतीत राहत होते. त्यामुळे जितेंद्र यांचे प्राथमिक ते बारावीचे शिक्षण मुंबईतच झाले. अभ्यासासोबत खेळ, वक्तृत्व स्पर्धा, नाटके यांमध्ये सहभाग घेऊन आपली आवड जोपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला. थोरांची चरित्रे वाचून काढली. खेळामुळे संघटित वृत्ती तर वाचनामुळे विचारांची बैठक तयार झाली. आत्मविश्वास वाढला. त्याकाळी आकाशवाणीवर किलबिलसारख्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, या शालेय जीवनातील नाटकात त्यांनी बालशिवाजी साकारला होता.१९८२ मध्ये दहावीमध्ये पोलिस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळविला. त्यानंतर अकरावी व बारावीसाठी ते पारला कॉलेजमध्ये दाखल झाले. योगायोगाने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांच्या वर्गात शिकायला होती. तिच्याशी जास्त बोलणे झाले नाही; पण नशिबामुळे व गुणवत्तेमुळे शाळा, महाविद्यालये चांगली मिळाली. शिक्षकांनी सर्वच विषयांचा पाया मजबूत करून घेतला. आयोगाच्या परीक्षांसाठी हा पाया मजबूत असणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेची तयारीच जणू शालेय जीवनापासून सुरू होती. बारावीनंतर कृषी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेण्याचा निर्णय घेतला. राहुरी कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली. महाविद्यालयाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. पदवीनंतर लगेचच पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. या परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले; पण त्यांना वर्ग १ चे पद खुणावत होते. त्यामुळे त्यांनी ही नोकरी स्वीकारली नाही. त्यानंतर कृषी खात्यातच वर्ग २ च्या जागी संधी मिळाली. एमटेक झाल्यानंतर कृषी उपसंचालक ही वर्ग १ ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. सोलापूर, नांदेड, सातारा येथे काम करताना ज्ञानाचा त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयोग करायचा ठरविले.शेतीसाठी पाणी आणि मजूर या दोन समस्यांवरच त्यांचे सध्या काम चालले आहे. जलयुक्त शिवारमध्ये असंख्य कामे त्यांनी उभी केली. ‘पर ड्रॉप...मोअर क्रॉप,’ हर खेत को पाणी,’ ‘वावर तिथे ठिबकची पॉवर,’ अशा संकल्पना साकारल्या. एका शेतकऱ्याने निर्माण केलेले यांत्रिकी शेतीचे तंत्रज्ञान कृषी विभागामार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची तळमळ त्यांच्या कृतीतून नेहमी दिसते.‘तंत्रज्ञान विकास’ हा अजेंडा घेऊन पुढे काम सुरू असल्याचे जितेंद्र शिंदे सांगतात. अभ्यासाच्या पुस्तकात ठेवून वाचली थोरांची चरित्रे!आई-वडिलांचे लक्ष अभ्यासावर असायचे. क्रमिक पुस्तके वाचण्यावर भर असायचा, आई अशिक्षित तर वडील सातवी पास पोलिस, तरीही त्यांचे विशेष लक्ष आम्ही काय अभ्यास करतोय, याच्यावर असायचे. मला वाचनाची एवढी हौस की क्रमिक पुस्तकांच्या पानांत ठेवून शिवचरित्र व इतर थोरा-मोठ्यांची चरित्रे मी वाचून काढली.खेळाने टिकवला उत्साहसंपूर्ण आयुष्य मुंबईत गेले. टेबल टेनिस, क्रिकेट, मॅरेथॉन या खेळांची आवड. अजूनही ती जोपासली आहे. साताऱ्यात झालेल्या हिल मॅरेथॉन स्पर्धा केवळ दोन तासांत पूर्ण केली. टेबल टेनिस स्पर्धेत विद्यापीठातील कॅप्टन होतो. तर क्रिकेट हा खेळ जीव की प्राण! रोज दोन तास व्यायाम काम करण्यासाठी फायद्याचा ठरतोय त्यामुळेच उत्साह कायम टिकून आहे.
मनात आलं ते केलं; आयुष्याचं समाधान मिळालं!
By admin | Updated: April 20, 2016 23:30 IST