संडे स्टोरी
— सचिन काकडे
वनसंपदेचा समृद्ध वारसा लाभलेले सातारकर पर्यावरणाच्या बाबतीत तर सजग आहेतच; परंतु सातारकरांची मुक्या प्राण्यांविषयी असलेली आत्मीयतादेखील वाखाणण्याजोगी आहे. अपघातात जखमी झालेली श्वानाची पिल्ले असोत किंवा हल्ल्यात, अशा भटक्या व पाळीव श्वानांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्याचं काम साताऱ्यातील दोन भावंडं गेल्या पाच वर्षांपासून करत आहेत. अक्षय साळुंखे व आकाश साळुंखे अशी या दोन तरुणांची नावं आहेत.
साताऱ्यातील करंजे येथे राहणाऱ्या या दोन्ही भावंडांना मुक्या प्राण्यांविषयी पूर्वीपासूनच आस्था आहे. ‘आपल्याला जर एखादी दुखापत झाली तर आपण कोणाला तरी सांगू शकतो. उपचारासाठी तातडीने दवाखान्यातही जाऊ शकतो; परंतु मुक्या प्राण्यांचे काय? हा प्रश्न आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हता. आपण अशा जखमी प्राण्यांसाठी काहीतरी करावं, असं मनोमनी वाटत होतं. त्यामुळेच आम्ही गेल्या पाच वर्षांपासून शहर व परिसरातील भटक्या व पाळीव श्वानांवर उपचार करण्याचे काम हाती घेतले. बऱ्याचदा श्वानांमध्ये भांडणं लागतात. यामध्ये अनेक श्वान जखमी होतात. याशिवाय श्वानांवर हल्ले होतात. काही श्वान वाहनांच्या चाकाखाली येऊन चिरडले जातात. सर्वात जास्त धोका श्वानांच्या लहान पिल्लांना असतो. पावसाळ्यात श्वानांची पिल्ले प्रचंड गारठलेली असतात. अन्न, पाण्यावाचून त्यांची परवड सुरू असते. असे भटके श्वान निदर्शनास आल्यास आम्ही तातडीने त्यांना खाऊपिऊ घालतो. त्यांच्यावर उपचार करतो. तरीही त्यांची तब्येत ठीक न झाल्यास आम्ही प्राणी तज्ज्ञांकडे नेवून त्यांची तपासणी करतो. त्यासाठी येणारा सर्व खर्चदेखील आम्ही स्वतः करतो’, असे अक्षय साळुंखे याने सांगितले.
‘आम्ही दरवर्षी जवळपास ७० ते ८० भटक्या श्वानांवर प्राथमिक उपचार करतो. ज्या नागरिकांना आमची माहिती आहे, ते स्वतःहून जखमी श्वानांची माहिती आम्हाला देतात. मुक्या प्राण्यांना आपण जीवदान देत आहोत, यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय असू शकते. आमचे मुक्या प्राण्यांवरील प्रेम आणि आमचे कार्य अविरतपणे सुरूच राहणार आहे’, असे मत आकाश साळुंखे याने व्यक्त केले.
(चौकट)
घराजवळ केलेली व्यवस्था
अक्षय व आकाश या दोघा भावंडांनी आपल्या घराशेजारीच भटक्या श्वानांसाठी एक खोली तयार केली आहे. जखमी श्वान आणल्यानंतर त्यांच्यावर याच खोलीत उपचार केले जातात. त्यांचे पालनपोषण केले जाते. गरजेनुसार पिल्लांना दूध व इतर खाद्यपदार्थही दिले जातात.
फोटो : मेल