गणेश काटेकर - कुसूर -कऱ्हाड तालुक्यातील कोळे वनविभागाच्या हद्दीत डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार सुरू आहे. अज्ञानी लोकांकडून हे कृत्य केले जात असून, वणव्यात वनविभागाकडून लावल्या गेलेल्या वृक्षांची होळी होत आहे. झाडे जळण्याबरोबरच छोट्या-मोठ्या वन्यप्राण्यांच्या वावरावरही त्याचा परिणाम होत आहे. जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने या घटना घडत आहेत. या घटनांना चाप लावण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.कोळे हे वनविभागाचे सर्वात मोठे नियत क्षेत्र आहे. हे संपूर्ण क्षेत्र डोंगरी भागात असल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. घनदाट झाडे-झुुडपे असल्यामुळे वन्यप्राण्यांसाठी येथे पोषक वातावरण आहे. तर वनविभागाच्या वनक्षेत्राला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. काही जमिनी आजही कसल्या जात आहेत. तर पडीक जमिनींमध्ये पाळीव जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत घेतले जाते. जानेवारीअखेर डोंगरी भागातील गवत काढणी पूर्ण होऊन शिवार मोकळा केला जातो. शेतामध्ये पडलेला पालापाचोळा तसेच बांधावरील गवताचे बुडके जाळले जातात. मात्र, शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे ही आग वनक्षेत्रात लागली जाते. यामध्ये शेकडो एकर क्षेत्र जळून खाक होते. तर काही बुरसटलेल्या विचाराच्या लोकांकडून जाणीवपूर्वक डोंगर पेटवून दिले जात आहेत. वणव्यांमुळे अनेक वन्य प्राण्यांचे जीव जात आहेत. तर लागवड केलेले वृक्ष जळून खाक होत आहेत. वणव्यात लाखोंचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनकर्मचाऱ्यांचे प्रयत्न; स्थानिकांचे दुर्लक्षप्रत्येक वर्षी डोंगरांना लागलेले वणवे विझविण्यासाठी रात्रीच्या वेळीही वन कर्मचारी जीवाची पराकाष्टा करताना दिसत आहेत. आग लागल्याची माहिती समजताच वनकर्मचारी त्याठिकाणी धाव घेतात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे काहीवेळा आग आटोक्यात आणण्यास उशीर होतो. तोपर्यंत बहुतांश डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला असतो. डोंगराला लागलेला वणवा विझविण्यासाठी स्थानिकांकडून म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत.तारुख परिसरात झाडे जळालीगतवर्षी कोळे क्षेत्रात दहा हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले आहे. तारुख, बामणवाडी, पवारवाडी, वानरवाडी, शिंदेवाडी, तुळसण नियत क्षेत्रालगत गत सात वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यापैकी साठ टक्के झाडे जगविण्यात वनविभागास यश आले आहे. तर वणव्यामुळे तीस टक्के रोपे जळून खाक झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरकोळे नियत क्षेत्रातील हजारो पाळीव जनावरे वनक्षेत्रातील चाऱ्यावर अवलंबून असतात. वनक्षेत्रातील मुबलक चाऱ्यामुळे मे अखेरपर्यंत सुकलेला चारा या जनावरांना उपलब्ध असतो. मात्र, वणवा लावण्याच्या प्रकारामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. औषधी वनस्पती नष्ट झाडाझुडपाने घनदाट गर्द असलेला वनक्षेत्रातील काही भाग वणवा लावण्याच्या प्रकारामुळे ओसाड होत आहे. अनेक औषधी वनस्पतीही नष्ट झाल्या असून, याठिकाणी वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली नसल्याने भविष्यात येथे ओसाड माळरान होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वणव्यात शेकडो झाडांची होळी
By admin | Updated: February 9, 2015 00:48 IST