सातारा : ज्या कोरोना योध्द्यांनी जीवाचे रान करून न घाबरता पहिल्या लाटेपासून काम केले, त्यांचे मानधन देण्यासाठी राज्य शासनाकडे निधी नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सद्यस्थितीत जास्त असताना ७९८ कोविड योद्धे निधीअभावी कमी करण्याचा घाट घातला असून, हा निर्णय बदलण्यात यावा, या मागणीसाठी कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेतर्फे गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन निधीचा विषय मार्गी लावून सर्व कोविड योध्द्यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
डाटा एन्ट्री ऑपरेटरसारखी महत्त्वाची पदे बाह्ययंत्रणेद्वारे यशस्वी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी संस्थेमार्फत राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून केवळ टक्केवारीसाठी याच आठवड्यात भरली गेली आहेत. अशा स्थितीत कोविड स्टाफ काढल्यामुळे कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढून धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कोरोना काळात सेवा करीत असताना बरेचसे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले. तरीसुद्धा अशा भयावह स्थितीत कोविड कंत्राटी कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. सध्या भयानक अशी कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तिसऱ्या लाटेची तयारी चालू आहे, अशा स्थितीत कंत्राटी कोरोना कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले.
कोरोना कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन, कित्येक कोविड रुग्णांचे प्राण वाचविले. याबद्दल कोविड कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कोविडची पहिली, दुसरी व तिसरी लाट पाहता आपण कोविडचे स्वतंत्र डिपार्टमेंट उभारावे. तेथे सेवेसाठी अनुभवी कोविड स्टाफ म्हणून कोविड योद्ध्यांना घ्यावे, शासनाने कोविड कर्मचाऱ्यांसाठी घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित वितरित केला जावा, जोपर्यंत आमच्या मागण्यांवर कायमस्वरूपी निर्णय होत नाही तोपर्यंत कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील रोजगार उपलब्ध करुन द्यावा, जोपर्यंत कोविड महामारी संपुष्टात येत नाही, तोपर्यंत कोरोना योद्धांना सेवामुक्त करू नये. ज्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे, त्यांना कोरोना योद्धा कर्मचारी परिषद संघटनेकडून दिलेल्या यादीप्रमाणेच पुन्हा कामावर रूजू करुन घ्यावे. कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न प्राधान्याने निकाली काढावा. कोरोना काळात कंत्राटी तत्त्वावर भरलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर, नर्स, वार्डबॉय, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशियन, औषध निर्माता - फार्मसिस्ट, इ. सी. जी. टेक्निशियन इत्यादी गट क दर्जाच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जिल्ह्यात महिन्याला ४५ लाखांचा निधी लागतो, जिल्ह्यात ९८ कोटींच्या निधीची कोरोना उपाययोजनेसाठी तरतूद केली आहे. त्यापैकी २ कोटी ७० लाख रुपयेची तरतूद केल्यास ६ महिन्यांचा कोविड योद्ध्यांचा पगाराचा प्रश्न मिटेल, कोविड काळात कोणताही ठेकेदार न नेमता कोविड योद्ध्यांना काम करण्याची संधी दिली, याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ठेकेदार न नेमता कोविड योद्ध्यांना काम करण्याची संधी द्यावी.
कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे सरचिटणीस श्रीनिक काळे, सोहेल पठाण, विराज शेटे, उमेश गायकवाड, डॉ. विशाल विरकर, सुरज शिंदे, सुषमा चव्हाण, गौरी भोसले, प्रज्ञा गायकवाड, दीक्षा धोत्रे यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले.
फोटो नेम : ०२जावेद