वेळे :
आशियाई महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील प्रत्येक गावच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाय म्हणून पथदिवे लावले. त्यामुळे महामार्गावरील गावे उजळून निघाली आणि अपघातांचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत झाली. परंतु या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने पुन्हा अपघात संख्या वाढणार यात शंकाच नाही.
आनेवाडी टोलनाका ते वेळे गावापर्यंत महामार्गावर असलेल्या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती झालेली दिसत नाही. त्यामुळे सुरूवातीला उजळून निघालेला महामार्ग सध्या अंधारातच असल्याचे दिसून येत आहे. याच अंतरात अखेर अनेक भीषण अपघात झालेले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे रस्ता ओलांडताना झालेले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना पथदिवे चालू असल्यामुळे त्रास जाणवत नव्हता. मात्र, आता काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्या कारणाने रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढतच आहे.
त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे विशेष लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे त्वरित चालू करावेत व या पथदिव्यांची देखभाल वेळच्या वेळी नियमितपणे करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करावी, अशी मागणी अनेक गावांच्या ग्रामस्थांमधून होत आहे.
फोटो : वेळे येथील महामार्गावर असलेले बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत आहेत.