लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. तरीही शासन आदेशानुसार कोविड ड्युटीसह शैक्षणिक कामात हजेरी लावून शिक्षकांनी आपले काम पूर्ण केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाल्या, पण त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच कोविडचे आकडे वाढू लागल्याने शाळा बंद करण्यात आल्या. शिक्षकांना शैक्षणिकबरोबरच प्रशासकीय कामाचा भागही सोपविण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षकांची टीम कोविडच्या कामासाठीही धाडली होती.
नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत कोरोनाचा प्रकोप जरा कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालकांचे संमतिपत्र घेणे बंधनकारक केले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळेत पाठविण्यास नकार दिला. परिणामी शिक्षकांचीही हजेरी कमी झाली.
चौकट :
प्राथमिक शाळा सुरूच नाहीत
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा गेल्या शैक्षणिक सत्रात सुरूच झाल्या नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनामुळे हे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत.
ग्रामीण भागात वाढल्या तक्रारी!
शाळा बंद असल्यामुळे शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवले. पण ग्रामीण भागात आॅनलाइन शिक्षणाची गोची झाली आहे. विद्यार्थ्यांकडे अॅण्ड्रॉइड मोबाईल नसणे, नेटवर्कच्या समस्या, रिचार्जचा खर्च, कुणाला आॅनलाईन समजलेच नाही, अशा अनेक अडचणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. सुमारे ३० टक़्के विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही.
कोट :
तेव्हा सर्व यंत्रणा कामाला लागली होती
शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्देश आल्यानंतर शिक्षण विभागाबरोबरच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. फार काळ शाळा सुरू राहू शकल्या नाहीत. यंदाही शासनाकडून शाळा सुरू करण्याचे निर्देश आले नाहीत. पण शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश आले आहेत. त्यानुसार पहिली ते नववीपर्यंत व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहील. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे आदेश आहेत.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा
काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आम्ही शाळा सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शाळेची स्वच्छता, सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगनुसार बसण्याची व्यवस्था केली. पण कोरोनामुळे अल्पावधीतच शाळा बंद कराव्या लागल्या.
- मनोहर साळुंखे, सातारा
मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. विद्यालय सुरू झाल्यामुळे आम्हाला झाला होता. शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जोखीमही होती. पालकांकडून तसे संमतिपत्र भरून घेतले होते. शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांमध्येही आनंद होता. पण तो प्रयत्न अल्पावधीतच अपयशी ठरला.
- वसंत देशमुख, सातारा