फलटण : ‘प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळालेल्या फलटण ते सीतामाई डोंगर घाटरस्त्याला अखेर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे फलटण-माण-खटाव तालुक्यांत अधिक दळणवळण वाढून हे तालुके आणखी जवळ येणार आहेत,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘सीतामाई डोंगराला ऐतिहासिक परंपरा व वारसा आहे. माता सीतामार्इंनी येथे बराचकाळ वास्तव्य केले होते. फलटण तालुक्यातून सीतामाई डोंगर जवळ असूनही रस्ता नसल्याने त्याला माण तालुक्यातून किंवा खटाव तालुक्यातून वळसा घालून जावे लागत असे. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. रोजगार हमी योजनेतून घाट रस्त्याचे काही काम झाले होते. मात्र रस्ता नव्हता. रोजगार हमीतून हा रस्ता वगळून या रस्त्याचा प्लॅन माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी करून घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हिंदुराव निंबाळकर यांनी फलटण, उपळवे, सीतामाई घाटरस्ता याला जिल्हामार्ग म्हणून मंजुरी मिळविली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.’जिल्हामार्ग म्हणून मंजुरी देताना राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७ कोटी ५४ लाखांची तरतूद करताना हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. फलटण-कुरवली-दालवडी-उपळवे-वेळोशी- कुळकुजाई असा जिल्हामार्ग मंजूर झाला असताना सीतामाई डोंगर व घाटरस्ता वनविभागाच्या ताब्यात असल्याने अडचणी येत होत्या. राज्यशासन पर्यायी जागा देण्यासाठी तयार होते. मात्र, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागातून परवानगी मिळणे गरजेचे होते. त्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दोन वर्षे सातत्याने दिल्ली दरबारी प्रयत्न केल्यानंतर केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.हा रस्ता होणार असल्याने फलटण-माण-खटाव हे तालुके आणखी जवळ येणार आहेत. दळणवळण वाढण्याबरोबरच बाजारपेठाही जवळ येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात होणार आहे, असेही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकात स्पष्ट केले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दुष्काळी पट्ट्यातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम करण्याचा आम्ही शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे. फलटण ते वेळोशी चकाचक व अधिक रुंद असा रस्ता होणार आहे. वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर
सीतामाई घाट रस्त्याला हिरवा कंदील
By admin | Updated: August 9, 2015 21:07 IST