लोहोम : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे-सातारा दरम्यानच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. पंढरपूर फाटा येथील ऐतिहासिक पाणपोईचे भवितव्य ‘रस्त्यावर’ आहे. सहापदरीकरण करत असतानाच ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. खंडाळा तालुक्यात महामार्गाच्या सहापदरीकरणाचे कामही झपाट्याने सुरू आहे. याच मार्गावर पंढरपूर फाटाच्या पुढे चौपाळा येथे शिवकालीन पाणपोई आहे. ही पाणपोई साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची आहे.ती अनेक वर्षांपासून जीर्ण झाली असून, मोडकळीच्या स्थितीत इतिहासाची साक्ष देत आहे. जवळूनच महामार्ग जात आहे, या ठिकाणाहून लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्याची वर्दळ असते. तरीही पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सहापदरीकरणाच्या कामात या ऐतिहासिक पाणपोईचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल किंवा वळणरस्ता घेऊन ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणी शिवप्रेमींमधून होत आहे. (वार्ताहर)शिवाजी महाराजांच्या काळात ही पाणपोई घोडेस्वार तसेच वाटसरूंसाठी विसावा घेऊन तहान भागवित होती. या ठिकाणी आजही मोठे दोन रांजण असून, भोवताली पुरातन दगडांचे बांधकाम केले आहे. या मार्गावरून जाणाऱ्यांना ही पाणपोई शिवकालाची आठवण करून देत आहे.
शिवकालीन पाणपोईचे भवितव्य ‘रस्त्यावर’!
By admin | Updated: December 19, 2014 00:29 IST