स्वातंत्र्यापूर्वी सातारा जिल्हा हा पूर्वीचा सांगली आणि सातारा असा दोन्ही जिल्ह्यांचा मिळून एकच जिल्हा होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्याची चळवळ अगदी जोमाने चालली होती. साताऱ्यात राजे प्रतापसिंह यांनी स्वातंत्र्य काळातील चळवळीत आघाडीची भूमिका घेतली होती. १० फेब्रुवारी १८१८ रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावर इंग्रज आपले बस्तान बसविण्याच्या तयारीत होते. राजे प्रतापसिंह भोसले यांनी १८३५ दरम्यान इंग्रजांना माहीत न होता विविध संस्थाने आणि अगदी रशियाशी गुप्तपणे संधान साधले होते. पण इंग्रजांना त्याची कुणकूण लागलीच. १८३६मध्ये त्यांनी या बंडाचा तपास करण्यासाठी कमिटी नेमली. प्रतापसिंह महाराज यांनी लिहिलेली पत्रे इंग्रजांच्या हाताला लागली होती. त्याच्या आधारे त्यांनी ५ सप्टेंबर १८३९ला महाराजांना पदच्युत केले. त्यांना साखळदंडाने पकडून लिंब येथे ठेवण्यात आले. त्यांचे अतोनात हाल केले आणि त्यांना पुढे बनारसला पाठविण्यात आले. तिथेच १८४७ साली त्यांचे निधन झाले. दरम्यानच्या काळात रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये १४ वर्षे राहून शाहू महाराजांची बाजू इंग्रज सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी पुन्हा साताऱ्यात येऊन सातारची गादी पुर्नस्थापित करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब फडणवीस आणि रंगो बापूजी यांनी सातारच्या गादीने पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न केले.
१८५६पासून बंडाची तयारी सुरु झाली. १८५७मध्ये अखेरीस धारवाड, कोल्हापूर, सातारा याठिकाणी बंडाला सुरुवात झाली. भोरच्या संस्थानिकांनी त्यासाठी मदत केली. त्याचवेळी सैन्यातही उठाव झाला होता. त्यामुळे साताऱ्यातील चळवळीला चांगलेच बळ मिळाले. सैनिकांनी भूमिगत होऊनही हा लढा दिला. बंदुका तयार करणे, दारुगोळ्याचे उत्पादन करणे, ईस्ट इंडिया कंपनीचे खजिने लुटणे असे प्रयत्न या काळात झाले. काही लोकांमुळे ही माहिती इंग्रजांना मिळाली आणि २७ ऑगस्ट १८५७ ते ७ सप्टेंबर १८५७ या कालावधीत त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. फाशीचा वड येथे १७ जणांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली.
८ ऑगस्ट १९४२ला गवालिया टँक (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. या काळातच प्रतिसरकार आपले काम चोख बजावत होते. इंग्रजांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देणे आणि स्थानिक गुंड देत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना शिक्षा करणे, असे काम केले जात होते. सरकारच्या समकक्ष यंत्रणा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी राबवली होती. औंध संस्थान स्वतंत्र होते. त्याठिकाणी कोणाचाही हस्तक्षेप झालेला नव्हता. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांनी १९४२ ते १९४३ या कालावधीत १६७ मिरवणुका १४८ प्रचारसभा असे कार्यक्रम राबविले.
कऱ्हाड हे देखील त्याकाळात चळवळीचे मुख्य केंद्र होते. बाळकृष्ण पाटील, दादासाहेब उंडाळकर यांनी कचेरीवर मोर्चा काढला, कचेरीवर झेंडा फडकविणे, निदर्शने करणे असे प्रकार सुरुच होते. त्याकाळात सरकारी नोकरी सोडून सुमारे ३०० जण फरार झाले होते. भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ सुरुच ठेवली होती. रेठेर बुद्रुक याठिकाणी यशवतंराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघाला होता. ३१ मार्च १९४३ रोजी घातपाताचे अनेक प्रकार घडले. टेलिफोन तारा तोडल्या गेल्या, पोस्ट कार्यालये जाळली गेली. जवळपास १८ गावांमध्ये अशा घटना घडल्या होत्या.
नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारची ओळख पत्रीसरकार अशी झाली होती. त्यामुळे अन्याय करणारे आणि इंग्रजांची बाजू घेणारे जरा वचकूनच होते. धडाकेबाज मोहिमा हाती घेऊन त्या राबविल्या जात होत्या आणि त्याच्या माध्यमातून जरबही बसवली जात होती. या चळवळींची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र भारत पत्रिका काढली जात होती. ती वेगवेगळ्या अठरा गटांच्या माध्यमातून पोहोचवली जात होती. २० ऑगस्ट १९४३ रोजी सातारा - पुणे महामार्गावर मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्वाधिक टेलिफोनचे खांब तोडण्यात आले आणि ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. प्रतिसरकारने आपला १४ कलमी कार्यक्रम राबविला होता आणि १८ गटांच्या माध्यमातून ही चळवळ वृद्धिंगत करण्यात आली.