पुसेगाव : भारताच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खटाव तालुक्यातील काटकरवाडी (जयपूर) या गावाला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देण्यात आला आहे,’ अशी माहिती तहसीलदार विवेक साळुंखे यांनी दिली.पुसेगावपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले काटकरवाडी या गावाचा कटगुण या गावाच्या अंतर्गत समावेश करण्यात आला होता. ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या माध्यमातून या काटकरवाडीत घरोघरी स्वच्छतागृहे बांधण्यात आली. निर्धुर चुलींची योजनाही यशस्वीपणे राबवली. गाव हगणदारीमुक्त झाल्याने गावाची जलस्वराज्य योजनेसाठी निवड झाली होती. आपल्या वाडीस स्वतंत्र चेहरा व अस्तित्व असावे, यासाठी ग्रामस्थांनी २००५ मध्ये स्वतंत्र महसूल गावासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोव्हेंबर २०१२ मध्ये प्रसिद्धीही मिळाली. यासाठी आयुक्त चंद्रकांत दळवी, अॅड. शंकरराव निकम, अॅड. पांडुरंग पोळ यांनी विशेष सहकार्य केले. गेली आठ वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व भूमीअभिलेख कार्यालय, वडूज यांना दि. १३ डिसेंबर २०१२ मध्ये या गावाचा स्वतंत्र नकाशा व आकारबंद तयार करण्यासाठीचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. १८ एप्रिल २०१३ रोजी गावकामगार तलाठी यांना या गावाचा स्वतंत्र सातबारा व आठ-अ तयार करण्यासाठीचे तहसीलदारांचे आदेश मिळाले. मात्र, सतत पाठपुरावा करूनही यश मिळत नव्हते.१५ आॅगस्टचे औचित्य साधून १४१ वे महसूल गाव म्हणून काटकरवाडी (जयपूर) या गावाला खटाव तालुक्यात स्थान प्राप्त झाले. मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते काटकरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते भरत निकम, प्रा. कैलास काटकर, किरण काटकर यांना गावाच्या नवीन सातबाऱ्यांचे वितरण करण्यात आले. (वार्ताहर)नऊ वर्षांचा लढा आला कामीकाटकरवाडीला स्वतंत्र गावाचा दर्जा नसतानाही या गावातील लोकांनी एकीचे दर्शन दाखविले होते. गावातील घरोघरी स्वच्छतागृहे, बिनधुराची चूल अभियान यशस्वी केले होते. जलस्वराज्य योजनेसाठी निवड झाल्याने या गावाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. २००५ पासून स्वतंत्र गावासाठी लढा सुरू होता. तब्बल नऊ वर्षांनंतर या लढ्याला यश आले. काटकरवाडीला स्वतंत्र दर्जा मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
काटकरवाडीला स्वतंत्र गावाचा दजा
By admin | Updated: August 17, 2014 22:31 IST