सातारा : नऊ वर्षांच्या बालिकेला घरी नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी ५५ वर्षांच्या आरोपीस न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास पाच महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये हा निकाल दिला.हिराजी रामचंद्र भिसे (वय ५५, रा. भवानी पेठ, सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुमारे सात ते आठ महिन्यांपासून एका नऊ वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने घरी नेऊन तिच्याशी शारीरिक लगट आणि अश्लील चाळे केल्याचा आरोप त्याच्यावर होता. आपण घरात नसताना तो हे कृत्य करीत असल्याची फिर्याद तिच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात २ नोव्हेंबर २०१४ रोजी दिली होती. महिला सहायक पोलिस निरीक्षक पी. पी. किर्दत यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. पीडित मुलगी आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ (१) (एम) १० अंतर्गत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पेहरवी विभागाचे रेहाना शेख, शशिकांत भोसले, अविनाश पवार, नंदा झांजुर्णे, कांचन बेंद्रे, अजित शिंदे, शमशुद्दिन शेख यांनी साह्य केले. (प्रतिनिधी)
लैंगिक शोषणप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: April 7, 2016 23:52 IST