वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे भीती वातावरण पसरले आहे.
वाई तालुक्याच्या पूर्वभागात गेल्यावर्षीपेक्षा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. काही गावांमध्ये हे प्रमाण अर्धशतकाच्या जवळपास आहे तर काही गावे शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. वेळे, गुळूंब, चांदक, सुरुर, केंजळ, वाहागाव, कवठे इत्यादी गावांमध्ये गेल्यावर्षी घेतलेल्या काळजीने रुग्णसंख्या आटोक्यात होती. यावर्षी याच गावांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असताना दिसत आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी अनेक गावांनी उपाययोजना केल्या. परंतु, लोकांमध्ये असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाने याचा फायदा होताना दिसत नाही. होम आयसोलेशनमध्ये असतानाही रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय गावात फिरल्याने त्यांनी सायलेंट स्पेडरची भूमिका निभावली. त्यामुळेच कदाचित याचा संसर्ग वाढत गेला.
या भागातील अनेक रुग्ण कोरोनाने अत्यवस्थ आहेत. काही रुग्ण घरीच इलाज घेत आहेत. अत्यवस्थ असलेल्या काही रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांची खूप परवड होत आहे. अशातच रुग्ण दगावण्याची भीतीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार गावातच लपूनछपून करत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येला आवर घालता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळते.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उपाययोजनांचा अभाव पाहायला मिळतो. अनेकजण नियमांना बगल देत आहेत. तसेच अनेक गावांमधून ग्रामदक्षता समिती अकार्यक्षम असल्याची खात्री होत आहे. स्थानिक प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. अनेक गावांमधून औषध फवारणी होताना दिसत नाही. मूलभूत उपाय राबविताना स्थानिक प्रशासनाची दमछाक होत असेल तर हे कोरोना कसे थोपवणार? अशी चर्चादेखील सोशल मीडियातून होत आहे.
चौकट
लोकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे
जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून येथील स्थानिक प्रशासनाला वेळीच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकांनीही वैयक्तिक जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. तर आणि तरच कोरोनाशी सामना होवू शकतो. अन्यथा रुग्णांचा वाढता आलेख हा सर्वांनाच धोकादायक ठरणार आहे.