कऱ्हाड : जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कऱ्हाड व पाटण तालुक्यामध्ये ऊसक्षेत्र जास्त आहे. या दोन्ही तालुक्यांत सध्या पाच कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांचे ऊसतोडणी मजूरही ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. मात्र, मजुरांची संख्या कमी असल्याने तोडणीचे काम गतीने होत नसल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. चार ते पाच गावांसाठी आठ-नऊ मजुरांची एकच टोळी कार्यरत असल्याने शिवारातील ऊसतोडणी उरकणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच फड पेटण्याच्या घटनांतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील बहुतांश क्षेत्र बागायती आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने या पट्ट्यात माळव्याच्या पिकांसह हुकमी उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागण मोठ्या प्रमाणावर केली जाते. दरवर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाही या दोन तालुक्यातील बहुतांश गावांत ऊसतोडणीचे काम उरकलेले नसते. काही क्षेत्रातील ऊस फडातच उभा असतो. यावर्षीही हीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. कारखाना सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, तरीही तोडणी उरकलेल्या नाहीत. शिवारात बहुतांश क्षेत्रातील ऊस उभाच असल्याचे दिसते. काही ठिकाणच्या शिवारात उसाला तुरेही आले आहे. ऊसतोडणी रखडण्यामागे मजुरांची कमतरता हे मुख्य कारण आहे. मजूरच उपलब्ध नसल्याने उसाची तोडणी होतच नाही. काही वर्षांपूर्वी दीपावलीपूर्वीच ऊसतोडणी मजूर येथे दाखल होत होते. टोळ्यांमध्ये दहापेक्षा जास्त मजुरांची संख्या असायची. तसेच टोळ्याही मोठ्या प्रमाणात ऊस पट्ट्यामध्ये दाखल व्हायच्या. एका गावात चार ते पाच टोळ्यांकरवी ऊसतोडणीचे काम चालायचे. त्यामुळे एक-दोन महिन्यांतच गावातील बहुतांश शिवार रिकामे व्हायचे; पण हळूहळू ही परिस्थिती बदलली. टोळ्यांतील मजुरांची संख्या कमी झाली. एका टोळीत फक्त पाच ते सहा मजूर असायचे. मात्र, त्याही परिस्थितीत ऊसतोडीचा प्रश्न उद्भवत नव्हता. कारखान्यांचा हंगाम संपेपर्यंत गावागावातील ऊसतोडणी उरकायच्या. सध्या मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. टोळीतील मजुरांच्या संख्येबरोबरच टोळ्यांचीही संख्या कमी झाल्याचे दिसते. चार ते पाच गावांसाठी कारखान्याकडून एकच टोळी पुरविली जात आहे. संबंधित टोळीतील सहा-सात मजूर पाच ते सहा गावांतील उसाची तोडणी करीत आहेत. त्यामुळे तोडणीचे काम वेळेत होत नाही.मजुरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून हार्वेस्टर मशीन घेण्यात आल्या. मात्र, त्या काही भागापुरत्याच मर्यादित आहेत. तो भाग वगळता इतर ठिकाणी मजुरांकरवीच तोडणी केली जात असून मजुरांच्या तुटवड्यामुळे तोडणीचे काम होत नसल्याचे दिसते. परिणामी, शेतकऱ्यांना कारखान्याच्या गट कार्यालयात तोडीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. उसाला तोडणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. एवढे करूनही वेळेत तोडणी मिळत नसल्याने त्याचा फटका ऊसाला बसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे. काही दिवसांपासून फड पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगोदरच उसाला तोड मिळत नाही. अशातच फड पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऊस पेटण्याच्या प्रमाणात अचानक वाढ कशी झाली, हासुद्धा सध्या संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनीच हाती घेतला कोयताऊसतोड मजुरांचा तुटवडा सर्वत्रच जाणवत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी स्वत:च हातात कोयता घेऊन ऊसतोड करण्यास सुरूवात केली आहे. काही युवकही त्यासाठी सरसावले आहेत. बहुतांश गावांमध्ये आठ ते दहा युवकांनी एकत्रित येऊन ऊसतोड टोळी तयार केली आहे. संबंधित युवक शेतकऱ्यांना ऊसाची तोडणी व भरणी करून देतात. त्याचा मोबदला ते शेतकऱ्यांकडून घेतात. युवकांच्या या टोळ्यांमुळे काही गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकरी म्हणे... मेरा नंबर कब आएगा?
By admin | Updated: January 15, 2015 23:35 IST