भुर्इंज : ‘मुंबईला जाण्यासाठी पाचवडहून निघालेल्या खासगी प्रवासी बसमध्ये बसवतो,’ असे सांगून बाप-लेकीला एका खासगी जीप चालकाने ‘लिफ्ट’ दिली. गाडी काही अंतरावर गेली असता, गाडीचा दरवाजा उघडला आहे, तो नीट बसवा, असे सांगत वडिलांना खाली उतरविले. त्यानंतर त्यांना खालीच सोडून युवतीचे अपहरण करून तिला घाटमाथ्यावर नेले. तिच्यावर अतिप्रसंग करून तेथेच सोडून दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्गाजवळील शिरगाव घाटात रात्री घडली.याबाबत माहिती अशी की, सातारा येथील बसस्थानक परिसरात काल, सोमवारी एक सोळावर्षीय तरुणी तिच्या वडिलांसह मुंबईला जाण्यासाठी आली होती. बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या खासगी जीपचालकाकडे जाऊन मुंबईला जाण्यासाठी खासगी गाड्या कुठे उभ्या राहतात, याची त्यांनी विचारणा केली. यावेळी संबंधित चालकाने ‘पाचवडला चला, तेथे माझ्या मित्राची गाडी मुंबईलाच निघाली आहे,’ असे सांगत गाडीत बसण्यास सांगितले. त्यांची गाडी रात्री बाराच्या सुमारास उडतारे हद्दीत आली असता, गाडीचा मागचा दरवाजा उघडला आहे, तो परत बसवा, अशी विनंती चालकाने केली. त्यानुसार तरुणीचे वडील गाडीतून उतरले असता, त्यांना खालीच सोडून युवतीसह गाडी शिरगावच्या डोंगरावर नेली. त्या ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग करून तिला तेथेच सोडून जीप चालकाने तेथून पोबारा केला.मध्यरात्री एक वाजता घाटमाथ्यावरच्या अंधारात धीर न सोडता संबंधित युवतीने स्वत:ला सावरले. घाट उतरून ती कशीबशी तीन किलोमीटर चालत राष्ट्रीय महामार्गावर आली. रस्त्यात अनेक वाहनांना हात करून वाहने थांबविण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र, वाहने थांबत नव्हती. शेवटी कंटाळून रस्त्याच्या मध्यभागीच उभे राहून दोन्ही हात लांब करत तिने एक ट्रक अडविला. ट्रकमध्ये बसल्यानंतर घडलेली हकिकत तिने ट्रकचालकास सांगितली. ट्रकचालकाला तिची दया आली. त्याने तिला पाणी पाजून घरी संपर्क साधण्यासाठी स्वत:चा मोबाईल दिला. तिने वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तत्काळ जिल्ह्यात नाकेबंदी केली. तसेच भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीही महामार्गावर धाव घेऊन युवतीला ट्रकमधून उतरवून घेतले. या प्रकरणी भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपीच्या शोधासाठी सातारा, वाई, खंडाळा, वाठार, कऱ्हाड येथे आज, मंगळवारी दिवसभर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. (प्रतिनिधी)
अपहरण करून युवतीवर अतिप्रसंग
By admin | Updated: July 2, 2014 00:27 IST