ढेबेवाडी : विद्यार्थ्यांना वेठीस धरून आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मालदन सजातील एका तलाठ्याच्या चौकशीची मागणी पालकांनी केली आहे. पंधरा दिवसांपासून तलाठ्यांची खुर्ची सांभाळणारे हे तलाठी ‘अण्णा मी चार्जच घेतला नाही,’ असे सांगून महसूल विभागालाच गंडा घालीत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. निलंबनाचा यापूर्वीचा इतिहास असलेल्या या तलाठ्यास ‘आमच्या सजात नियुक्ती करू नका,’ अशी मागणी विभागातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची धांदल उडाल्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र ग्रामीण विभागात दिसून येते. प्रवेशासह फी माफीसाठी तलाठ्यांचा रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला गरजेचा असल्याने तलाठी कार्यालये विद्यार्थ्यांनी फुललेली दिसत आहेत.या विभागात काही सजा तलाठ्यांविना आहेत. तर काही गावांमध्ये तलाठ्यांची नेमणूक असूनसुध्दा विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे. मालदन परिसरातील एका सजातील तलाठी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. तेथील तात्पुरता चार्ज ढेबेवाडीचे तलाठ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर १५ जून पासून याठिकाणी कऱ्हाडहून बदलून आलेल्या तलाठ्यांनी धुरा खांद्यावर घेतली. पंधरा दिवसांपासून येथील खुर्ची सांभाळणारे या तलाठी अण्णांनी मात्र लगेचच आकडेमोडीस सुरुवात केली. उत्पन्नाचा दाखला २०० रुपये, रहिवासी दाखला १०० रुपये आणि वारस नोंद २००० रुपये हे सर्व करताना पूर्वीचा इतिहास पाठीशी असल्याने आता ते चक्क तोंडाने आकडा न सांगता संबंधितांना कागदावर लिहून देत आहेत. ‘विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या तलाठ्यांची उचलबांगडी करा,’ अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) पद्भार घेतला नाही, मग दाखले कसे देता?विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी सध्या विविध दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ते तलाठी कार्यालयात जातात. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी रहिवासी व उत्पन्नाचा दाखला मागितला की, हे तलाठी दाखला देण्यासाठी आकडेमोड करतात. काही दिवसांपूर्वी याबाबत काही पालकांनी संबंधित तलाठ्यांना जाब विचारला. ‘पैसे पाहिजे असतील तर आम्हाला लेखी द्या,’ असे ते म्हणाले. त्यावर तलाठ्यांनी मी अजून पद्भारच घेतला नाही, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मुळात जर संबंधित तलाठ्यांनी पद्भार घेतलेलाच नाही, तर ते दाखले कसे देतायत, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.विद्यार्थ्यांची हेळसांडतलाठ्याच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. आकडेमोडीशिवाय त्यांचा पेनच हालत नाही. त्यांनी कामात बदल करावा; अन्यथा आंदोलन करावे लागेल.- दिलीप गुंजाळकर,ग्रामपंचायत सदस्य, मान्याचीवाडी
अण्णासाहेब घालतायत विद्यार्थ्यांना ‘टोपी’!
By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST