सातारा : येथील शासकीय मेडिकल कॉलेजसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चर्चेत असताना, बरोबर याच नावाला बगल देऊन यशवंतराव चव्हाण यांचे नाव चमत्कारिकरीत्या आणि अचानकपणे पुढे आणले गेले आहे. यामध्ये राजकारण असून हे राजकारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध आहे, अशी भावना साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची प्रशासनाला ॲलर्जी आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अरुण जावळे यांनी पुढे म्हटले आहे की, आंबेडकरांचे नाव मेडिकल कॉलेजला देण्यासाठीचा आंबेडकरवाद्यांचा आग्रह हा भावनिक नाही, तर त्याला मजबूत संदर्भाचे अधिष्ठान आहे. साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण गेले आहे. इथेच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. याच मातीतून त्यांनी ज्ञानाच्या, प्रज्ञेच्या नभांगणात उंच भरारी घेऊन जगाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमधील विद्यापीठांत डॉ. आंबेडकराचे पुतळे गौरवाने उभे राहताना पाहायला मिळताहेत. आज जगामध्ये 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी जी ओळख आहे, ती याच एकमेव महामानवाची !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विचार संविधानाच्या माध्यमातून या भारतभूमीत रुजवला. डॉ. आंबेडकर जेव्हा एखादे पत्र लिहीत असत तेव्हा ते 'जय शिवराय' या उद्घोषणेने पत्राची सुरुवात करीत. छत्रपती शिवरायांच्या बरोबरच, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे विचारकार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणले. मुळात विद्वत्तेचे, शिक्षणाच्या क्षेत्रातील उत्तुंग प्रतिभेचे आणि बॅरिस्टर असणारे तसेच ज्यावर देश चालतो, त्या भारताच्या संविधानाचा शिल्पकार असणारे व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या या मेडिकल कॉलेजसारख्या एखाद्या आस्थापनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असणे अधिक रास्त व औचित्यपूर्ण ठरणार आहे.
वास्तविक, मागील दीड-दोन वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यांनी निवेदने देण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारात आंदोलनेही केली आहेत. अर्थात ही बाब प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला बगल देणे योग्य नाही. यशवंतराव चव्हाण यांचे योगदान निश्चितच मोठे आहे. त्यांच्या एकूण कार्याचा आंबेडकरवाद्यांना अभिमान आहेच. तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चर्चेत असताना, तशा पद्धतीची जिल्हाधिकारी यांच्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने पोहोचली असताना, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने राजकारण व्हायला नको होते.