लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वैश्विक पातळीवरील बदलती मानवी जीवनशैली व त्यामध्ये आलेले बदल यामुळे कळत-नकळत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गिधाडांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाळीव पशुधनामध्ये वेदनाशामक म्हणून वापरले जाणारे ‘डायक्लोफिनॅक’ या पेनकिलर औषधाच्या वापरामुळे व अशा औषधाचा वापर केलेल्या मृत जनावरांचे या गिधाडांनी मांसभक्षण केल्यामुळे ही समस्या प्रामुख्याने निर्माण झालेली आहे.
भारत सरकारमार्फत त्याकरिता २०२० ते २०२५ या कालखंडात त्यांच्या संवर्धनाकरिता कृती आराखडा तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे गिधाड संवर्धन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. १९९० च्या दरम्यानपासून यांची संख्या कमालीची घटली असून, किंबहुना महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमधून यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा भाग वगळता आणि मध्य मराठवाडा तसेच विदर्भातील काही ठिकाणे वगळता त्यांचे अस्तित्व जवळपास नाहीसे झालेले आहे. पूर्वीच्या काळी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रामध्ये त्यांची चांगली संख्या दिसून येत होती. थोरा-मोठ्यांनी तर त्यांच्या गावकुसाबाहेर गावातील मृत जनावरांच्या शरीरावर गिधाडांचे थवेच्या थवे पाहिल्याचे अनेक दाखले आहेत.
निसर्गामध्ये कोणताही जीव जन्मास आला तर त्याला जगण्याचा पूर्ण अधिकार निसर्गत: असतोच आणि त्याची जैव शृंखलेमध्ये ठराविक अशी भूमिका ठरलेली असते. यानुसारच गिधाड हा मृतभक्षी व स्वच्छतारक्षक म्हणून निसर्गामध्ये काम करीत असून, त्याद्वारे त्यामधून पसरणाऱ्या रोगराईस अटकाव करण्याचे कामदेखील तो करीत असतो. पूर्वीच्या काळी गावा-नगरांमध्ये पाळीव मृत जनावरे उघड्यावर टाकण्याची पद्धती होती. सध्या या पद्धतीमध्ये एक चांगला बदल जरूर झालेला आहे की जो म्हणजे अशी जनावरे आता उघड्यावर न टाकता त्यास पुरणे अथवा दहन केले जाते. साहजिकच नैसर्गिक अन्न दुर्भिक्षासह गिधाडांना मानवी अशा जैव कचऱ्यामधून मिळणारे अन्नदेखील मिळेनासे झाले आणि जे मिळत होते ते डायक्लोफिनॅकयुक्त.
चौकट :
भारतात अस्तित्वात असणारी गिधाडे
भारतामध्ये प्रामुख्याने गिधाडांच्या प्रामुख्याने ९ प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये व्हाईट रंप्ड, लॉन्ग बिल्ड, स्लेंडर बिल्ड, रेड हेडेड, सिनेरस, हिमालयीन, इजिप्शियन, बर्डेड व युरेशियन या प्रजातींचा समावेश होतो. यापैकी युरेशियन हे इतर देशांमधून स्थलांतर करून येणारे गिधाड वगळता बाकी सर्व प्रजाती या भारताच्या स्थानिक प्रजाती आहेत. यामधील व्हाईट रंप्ड व लाँग बिल्ड ही महाराष्ट्रात सर्वदूर आढळणारी गिधाडे सध्या कशीबशी तग धरून आहेत. ‘आययूसीएन’च्या स्थिती निर्देशक मानकांनुसार ही भारतीय गिधाडे सध्या अति संकटग्रस्त व नामशेष होण्याच्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहेत.
उबवण्याच्या अंड्याचे कवचही पातळ
गिधाडांच्या जीवनचक्रामध्ये वयाच्या ७ व्यावर्षी ती प्रजननक्षम होतात व त्यावेळी मादी १ अंडे देते. डायक्लोफिनॅकमुळे या अंड्यांची कवचदेखील पातळ होऊन मादी त्यावर बसल्यावर ती फुटत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यासह या औषधामुळे गिधाडांच्या मूत्रपिंडांवर देखील विपरित परिणाम होऊन ती मृत्युमुखी पडली. जनावरांमधील डायक्लोफिनॅक औषधाचा वापर थांबवून आणि उघड्यावर जनावरांचे मिळणारे अन्न या दोन्हींचा पर्याय देण्याबरोबरच जंगल अधिवासातील मानवी हस्तक्षेप कमी करून हा निसर्ग शृंखलेतील स्वच्छतेचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
कोट
२००० मध्ये पाकिस्तानमध्ये केलेल्या गिधाडांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये प्रथमत: ही गोष्ट सुस्पष्ट झालेली आहे. एकंदरच घटते वनक्षेत्र अधिवास नष्ट होणे यामुळे नैसर्गिकरित्या अन्न दुर्भिक्षामुळे गिधाडांच्या संख्येत कमालीची घट झालेली होती. त्यातच डायक्लोफिनॅकची भर पडल्याने गिधाडांची हाडे ठिसूळ होऊन अगदी हवेत उडतानाच पंख तुटून जमिनीवर पडून मेल्याचे दाखले दिले जातात.
- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा