परळी : सातारा तालुक्यातील परळी वीजवितरण कार्यालयाच्या कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे ठोसेघर, परळी भागातील जनता वैतागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ठोसेघर पठारावरील अनेक गावांमधील वीज गायब झाली आहे. त्यामुळे येथील जनता अंधारात असून, अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागत आहे. ठोसेघर पठारावरील बोपोशी, खालची-वरची पवारवाडी, मोरेवाडी, पवनगाव, ठोसेघर आदी गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून वारंवार वीज गायब होत आहे. अनेकवेळा वीज येत नाहीच. त्यामुळे येथील जनता अंधारात आहे. त्यामुळे अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्याचबरोबर या परिसरातील अनेक ठिकाणचे विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहेत. काही ठिकाणीतर भरवस्तीत वीजतारा लोंबकळत आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार भेटूनही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ग्रामपंचायतींच्या ठरावांनाही केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यामुळे येथील जनतेच्या मनात वीज कंपनीबद्दल रोष निर्माण झालेला आहे. (वार्ताहर)
ठोसेघेर पठारावर ‘बत्ती गुल’..!
By admin | Updated: August 24, 2014 22:35 IST