सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील पेशी कमी होतात. त्या वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून ड्रॅगनफ्रूट खाण्याचा सल्ला रुग्णांना दिला जात आहे. या फळाची मागणी वाढल्याने किमतीतही आता वाढ झाली आहे. बाजारपेठेत सध्या १२० रुपये एक नग या दराने ड्रॅगनफ्रूटची विक्री केली जात आहे. सफरचंद, डाळींब, पपई, संत्री, मोसंबी या फळांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत.
(चौकट)
आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी परदेशातून आयात केलेल्या सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाण सुरू होती. या सफरचंदाचे दरही प्रतिकिलो १५० ते २०० रुपये असे होते. आता जम्मू काश्मिर येथील फळांचा हंगाम सुरू झाल्याने दर झपाट्याने उतरले आहेत. सध्या ६० ते ७० रुपये किलो या दराने सफरचंद विकले जात आहे. आकाराने लहान व लालबुंद असलेल्या सफरचंदाला मागणीदेखील वाढली आहे.
(चौकट)
डेंग्यूवर ड्रॅगनफ्रूटचा उतारा
डेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगनफ्रूट खाल्ले जाते. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. मधुमेह, संधिवात, कर्करोग आणि दमा आदी आजारदेखील हे फळ नियंत्रित करते. शिवाय शरीरातील हानीकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डेंग्यू झाल्यास ड्रॅगनफ्रूट खाण्याचा सल्ला देतात.
(कोट)
व्यापारी म्हणतात..
जिल्ह्यात ड्रॅगनफ्रूटची शेती बोटावर मोजण्याइतके शेतकरी करतात. त्यांच्या शेतीतून उत्पादनही फारसे निघत नाही. त्यामुळे या फळाची परजिल्ह्यातून आयात करावी लागते. साथरोग वाढल्याने सध्या ड्रॅगनफ्रूटला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात एका नगामागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
- शहानूर बागवान, फळविक्रेता
(चौकट)
फळांचे दर (प्रतिकिलो)
ड्रॅगनफ्रूट १२० रुपये एक नग
डाळिंब १००
सफरचंद ६०
संत्री १६०/२००
मोसंबी ८०/१००
चिकू १००
पपई २०
पेरू ८०