सातारा: फलटण येथील श्रीराम बझारसमोरील रस्त्यावर दुचाकीला कुत्रे आडवे आल्यामुळे जखमी झालेल्या विडणी येथील किरण दुर्योधन जगताप या युवकाचा पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि. २४ मे रोजी घडली होती.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, किरण जगताप (वय २८, रा. विडणी, ता. फलटण) हा युवक फलटण येथील श्रीराम बझारसमोरुन जात असताना त्याच्या दुचाकीला कुत्रे आडवे आले. यामुळे त्याची गाडी स्लीप झाल्याने तो खाली पडला. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने तात्काळ उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर उपचार सुरू असताना दि. ३१ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर ससून हॉस्पिटलमधील डॉ. ए. पी. धाडेकर यांनी दिल्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली. अधिक तपास पोलीस हवालदार गिरी हे करत आहेत.