कऱ्हाड : रस्ते रुंदावले तसे हातगाडे वाढले आणि या हातगाड्यांवर शेगड्याही थाटल्या गेल्या. मात्र, शेगडीला गॅस पुरवठा करणाऱ्या सिलिंडरच्या सुरक्षेबाबत व्यावसायिक म्हणावे तेवढे गंभीर नाहीत. त्यामुळे शहरातला प्रत्येक रस्ता सध्या ‘सिलिंडर बॉम्ब’च्या भीतीने ग्रासल्याचे दिसते.
कऱ्हाड शहरातील बहुतांश ठिकाणे गर्दीची आणि रहदारीची बनली आहेत. काही वर्षांपूर्वी बसस्थानक, मुख्य बाजारपेठ ही गर्दीची ठिकाणे मानली जायची. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे. अगदी कोल्हापूर नाक्यापासून कृष्णा कॅनॉलपर्यंत रस्त्याच्या बाजूला वेगवेगळी दुकाने सुरू झाली आहेत. अंतर्गत रस्त्यांवरही अनेक व्यवसाय थाटले गेलेत. त्यामुळे अपवाद वगळता एकही रस्ता रिकामा नाही. प्रशस्त रस्ते आणि वाढती रहदारी यामुळे अनेकांनी रस्त्याकडेलाच हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित व्यावसायिक शेगड्या वापरीत असून, या शेगड्यांना व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणे बंधनकारक असताना काहीजण घरगुती सिलिंडरचा वापर करताना दिसून येत आहेत. पाहणी आणि चौकशी नसल्यामुळे व्यावसायिकांचे फावले आहे.
काहीजण नियमाप्रमाणे व्यावसायिक सिलिंडरचा वापर करतात. मात्र, सुरक्षेबाबत कोणीच गंभीर नसल्याची परिस्थिती आहे. बसस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात व्यवसाय करताना सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. व्यावसायिक कोठेही आणि कसाही सिलिंडर ठेवून त्याची पाईप शेगडीला जोडतात. त्यामुळे त्यांचा हा ‘कोठेही’ आणि ‘कसाही’ प्रकार सिलिंडरला ‘बॉम्ब’ बनविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
- चौकट
हातगाड्यांचा लेखाजोखा
वडापाव, चहा : ३०५
चायनीज पदार्थ : ११५
फळविक्री : १५०
कापडविक्री : ३०
स्वीटकॉर्न, मेवामिठाई : २०
सरबत, ज्यूस सेंटर : ५५
भाजीपाला विक्री : ३५
इतर : १२०
एकूण : ८३०
(पालिकेच्या नोंदीनुसार सुमारे)
- चौकट
कशाचे किती हातगाडे..
खाद्यपदार्थ : ४३ टक्के
फळ, भाजी : ३५ टक्के
शीतपेय : ९ टक्के
कापड : १३ टक्के
- चौकट
कारवाई करणार कोण..?
हातगाडी, हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर वापरल्यास संबंधितावर पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, सिलिंडरच्या सुरक्षेबाबत कोण कारवाई करणार, हा प्रश्न आहे. सुरक्षेबाबत कारवाई करण्याचे अधिकार पालिकेला नसल्याचे तेथील अधिकारी सांगतात, तर या प्रश्नाकडे पुरवठा विभाग आणि पोलीसही गांभीर्याने पाहत नाहीत.
- चौकट
व्यावसायिकांचा बेजबाबदारपणा
१) सिलिंडर भरउन्हात ठेवणे
२) एकाच ठिकाणी दोन-तीन सिलिंडर ठेवणे
३) रेग्युलेटरला जोडलेली पाईप सुस्थितीत नसणे
४) चालू सिलिंडरवर साहित्य रचणे
५) रहदारी असतानाही पाईप पसरणे
६) काम संपल्यानंतरही रेग्युलेटर बंद न करणे
७) शेगडी सुरू ठेवून इतरत्र जाणे
- चौकट
...याठिकाणी धोका जास्त!
१) बसस्थानक परिसर
२) विजय दिवस चौक
३) कृष्णा नाका परिसर
४) प्रीतिसंगम बाग
५) मुख्य बाजारपेठ
६) कोल्हापूर नाका
७) मंडई परिसर
८) कार्वेनाका परिसर
- कोट
हातगाड्यांवरील घरगुती गॅस वापराबाबत पुरवठा विभागाकडून वारंवार तपासणी व कारवाई केली जाते. सुरक्षेबाबतही व्यावसायिकांना सूचना केली जाते. रस्त्यावरील व्यवसायांच्या ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर होत असल्यास संबंधितांनी योग्य खबरदारी घ्यावी. सुरक्षात्मक उपाययोजना नसतील तर निश्चित कारवाई केली जाईल.
- गोपाल वासू, पुरवठा निरीक्षक, कऱ्हाड.