सांगली : गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी सायबर लॅब आणि फिरती न्यायवैद्यक प्रयोगशाळा निश्चितच उपयोगी पडणार आहे, असे मत सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा पोलिस दलाच्या सायबर लॅब आणि फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन देशमुख यांच्याहस्ते सोमवारी झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, सहाय्यक पोलिस निरीक्षक व सायबर सेलचे अंजीर जाधव उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, पोलिस प्रशासनाने चांगले काम करून राष्ट्राच्या व जनतेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहून आपला नावलौकिक वाढवावा. चांगल्या गोष्टींचे अनुकरण उशिरा होते. याउलट वाईट गोष्टींचे अनुकरण लवकर केले जाते. त्यामुळे गुन्हे का घडतात आणि ते घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांचे प्रबोधन करावे. वाईट गोष्टी आणि गुन्ह्यांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करावी. राष्ट्रप्रेमाची भावना रुजविल्यास अवैध व्यवसाय व गुन्हेगारी कमी होतील. (प्रतिनिधी)पोलिसांच्या घरांचा प्रस्ताव : सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत म्हणाले की, पोलिस खात्याला सायबर लॅब व अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज आहे. पोलिसांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. ते स्वत:चे कौटुंबिक आयुष्य विसरून सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. सामान्य माणसाला न्याय मिळेल, अशी प्रतिमा पोलिस दलाने जपली आहे. त्यामुळे आपण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात पोलिसांसाठी दोन हजार घरांचा प्रस्ताव पाठविला असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
सायबर लॅबमुळे गुन्हेगारीवरच वचक
By admin | Updated: August 16, 2016 23:33 IST