सातारा : तालुक्यातील लिंब खिंड ते वर्ये या मार्गावर असणाऱ्या पेट्रोलपंपाच्या समोरून बंद पडलेली दुचाकी घेऊन निघालेल्या दोघांना एका दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ललिता पांडुरंग शिंदे (वय ३८, रा. वर्ये, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा मयूर आणि त्याचा मित्र साहिल हे दोघे बंद पडलेली दुचाकी (एमएच ११ - सीपी १५८१) हे रामनगरच्या दिशेन ढकलत नेत होते. लिंब खिंड ते वर्ये या मार्गावर असणाऱ्या पेट्रोलपंपाच्या समोर दोघेही आले असता समोरून किरण मोरे (रा. नुने, ता. सातारा) हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच ११ - बीयू ९४९0) सुसाट वेगाने आला. या वेळी त्याच्या दुचाकीची धडक साहिल आणि मयूर याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीला बसली. यात दोघेही जखमी झाले तसेच या धडकेत त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी ललिता शिंदे यांनी बुधवार, दि. १३ रोजी किरण मोरे याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक महांगडे हे करत आहेत.