फलटण : फलटण शहरात बंदी असतानाही चायनीज मांजा विकत असणाऱ्या दोनजणांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथे यश ट्रेडर्स नावाच्या दुकानात विशाल शरद दोशी (रा. रिंग रोड फलटण) हे गुरुवार( दि. १२) सायंकाळी चायनीज मांजा विक्री करीत असताना मिळून आले आहेत. त्यांच्याकडून साडेचारशे रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
तसेच शुक्रवार पेठ फलटण येथे चंद्रकांत ज्वेलर्स नावाच्या दुकानात आकाश चंद्रकांत पालकर (वय २३, रा. शुक्रवार पेठ फलटण) हे त्यांच्या दुकानात साडेआठशे रुपये किमतीचा चायनीज मांजा विक्री करीत असताना मिळून आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
यापूर्वी फलटण शहरात तीन दुकानदार चायनीज मांजा विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावरही प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड यांनी केली आहे.