सातारा : जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कालावधीत जलसंधारणाच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देत दुष्काळी भागात एक हजार बंधारे उभारणीस प्राधान्य दिले. ‘या बंधाऱ्यांची निर्मिती माझ्या आयुष्यातील मोठा आंनद असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. विशेष म्हणजे, यापैकी नऊशे बंधारे पूर्ण झाले असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शुक्रवारी त्यांनी अन्य काही कामांना मान्यता देण्याच्या पत्रावर सही केली आणि त्याबाबतचा आढावाही सहकाऱ्यांकडून घेतला. माण, खटाव आणि फलटण तालुक्यांतील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना आखणारे जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. शनिवारी सातारकरांचा निरोप घेणार आहेत. त्यांची मुंबई येथे ‘म्हाडा’मध्ये बदली झाली आहे. दरम्यान, सातारचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल सूत्रे स्वीकारणार आहेत. सातारचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. रामास्वामी एन. यांचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या दालनात अधिकारी तसेच भेटायला येणाऱ्या अभ्यागतांशी ते संवाद साधत होते. याचवेळी ते काही फायलींवर सह्या करण्यातही मग्न होते. याचवेळी त्यांच्यांशी संवाद साधला असता त्यांनी सातारा जिल्ह्यातील कामाविषयी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे अतिशय चांगले सहकार्य मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आपल्या हातून कोणते काम चांगले झाले आणि कोणते काम होता-होता राहिले, याबाबत विचारणा केली असता त्यांनी जलसंधारणाच्या कामावर विशेष लक्ष देऊन दुष्काळ हटविण्यासाठी हातभार लागला असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न कोणताही वाद निर्माण न होऊ देता सोडविला. जिल्ह्यात शासकीय कार्यालयांसाठी नवीन इमारती उभ्या करता आल्या. रोजगार हमी योजनेचा निधी २.२५ लाखांवरून ५४ कोटींवर नेला. शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची कामे सर्वाधिक केली.माण तालुक्यातील शिंदी येथील किस्सा सांगताना जिल्हाधिकारी भावूक झाले. ते म्हणाले, ‘शिंदी येथे त्यांनी बंधाऱ्यासाठी ९० लाख रुपये दिले. कामे पूर्ण झाली. पहिल्याच पावसाने बंधारे तुंडूब भरले आणि गावकऱ्यांनी ५० लाखांचे उत्पन्न घेतले. जेवढे खर्च केले. तितक्याच प्रमाणात ग्रामस्थांनी उत्पन्न घेतले. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोच्च बहुमान होता. लोकांनी अश्रू अनावर होऊन माझ्याशी साधलेला संवाद माझ्यासाठी अस्वस्थ करणारा होता.’ (प्रतिनिधी)अश्विन मुदगल सातारचे ९३ वे जिल्हाधिकारीसातारचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून १८५४ मध्ये जे. एन. रोज यांनी सूत्रे स्वीकारली होती. पन्नासावे जिल्हाधिकारी म्हणून १९३८ मध्ये एम. जे. डिकॉट तर ७५ वे जिल्हाधिकारी म्हणून अरुण भाटिया यांनी १९७७ मध्ये सूत्रे स्वीकारली. डॉ. रामास्वामी एन. यांनी सातारचे ९२ वे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहिला. दरम्यान, शनिवारपासून सातारचे ९३ वे जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल पदभार स्वीकारणार आहेत.रामास्वामी एन. यांनी केला एक लाख किमी प्रवासजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘सातारा येथे नियुक्ती झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसांपासून मी माझ्या गाडीतून फिरत असताना नोंदी ठेवत होतो. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला असता मी जिल्ह्यात एक लाख किलोमीटर प्रवास केल्याचे माझ्या लक्षात आले. जिल्ह्याचा दौरा करत असताना अनेकदा माझ्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना बरोबर घेतले. दरम्यान, वसंतराव मानकुमरे यांनी काढलेल्या निवेदनाचा दाखला त्यांच्याशी चर्चा करत असताना पुढे आला असता मानकुमरे हा विषय आता मी विसरून गेलो असल्याचेही त्यांनी हसत-हसतच सांगितले.गतिमान प्रशासनाला प्राधान्यसातारा जिल्ह्यात गतिमान प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास माझे प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याचा काही भाग दुष्काळी आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणाला माझे प्राधान्य राहणार आहे.’ मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आणि राजकीय सजगता अशा वातावरणात आपल्या कामाची कार्यपद्धती काय राहील? अशी विचारणा केली असता त्यांनी कायद्याची चौकट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
हजार बंधाऱ्यांची निर्मिती आयुष्यातील मोठा आनंद
By admin | Updated: August 2, 2014 00:00 IST