वडूज : ग्रामपंचायतीने ‘प्रवेश बंद’ अशी जाहीर नोटीस लावूनदेखील धोकादायक पाण्याच्या टाकीखालून नागरिकांची वर्दळ सुरूच आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षापासून पाण्याची टाकी व्हेंटिलेटरवर असून, ती पडण्याची वाट ग्रामपंचायत पाहतेय का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. वडूज येथील पाण्याच्या टाकीपासून उपनगर असणारे कर्मवीरनगर, आमराईनगर, विठ्ठलनगर, शिवक्रांतीनगर, भाग्योदयनगर, गुलमोहर कॉलनी, तुपेवस्ती येथून बसस्थानकाकडे शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालयाकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता, पायवाट दुचाकीस्वारांना जवळ पडत असल्याने येथून दैनंदिन हजारोंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ सुरू असते. परंतु ग्रामपंचायतींच्या प्रवेश बंद जाहीर नोटिसीला वाटाण्याच्या अक्षता लावून प्रसंगी जीवमुठीत घेऊन येथून ये-जा सुरूच असते. यापूर्वी या पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेने आत्महत्या केली होती. त्यामुळे या परिसरात ग्रामपंचायतीने एका कामगाराचे कुटुंब वास्तव्यास ठेवले. पाण्याच्या टाकीवर प्रकाशझोत सुरू ठेवला आहे. त्यामुळे हे कुटुंबसुध्दा जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहे. या पाण्याच्या टाकीसंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, सांगण्यात आले की गत दीड वर्षापूर्वी ही टाकी धोकादायक अवस्थेत असल्याचे ग्रामपंचायतीकडून लेखी स्वरूपात माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ही टाकी व तेथून ले-आऊटसाठी (पाणी वितरित करण्यासाठी) असा अंदाजे खर्च सव्वा कोटीचा असल्याचे इस्टिमेट तयार केले. परंतु या कामी लागणारी लोकवर्गणी न भरल्यामुळे या निविदा रद्द झाल्या. या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न समोर आला आहे.वडूज शहराची नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबिल भरताना ग्रामपंचायतीला नाकीनऊ येत असताना ही लोकवर्गणी भरणे महाकठीण बनले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी गत झाली आहे. त्यामुळे वडूज शहरातील या निकृष्ट टाकीचे लवकरात लवकर काय ते ठरवावे व नवीन टाकी उभारावी, अशी मागणी वडूजकर नागरिकांतून जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाने दखल घ्यावी रस्त्याच्या कामांना ठेकेदारच लोकवर्गणी भरतात तर बांधकाम अथवा पाण्याच्या टाकीसाठीच लोकवर्गणी भरण्यात ग्रामस्थ टाळाटाळ का करतात, ही ओरड कशासाठी असा जाहीर सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. ग्रामसभेत ठराव झाले असले तरी या जीवघेण्या प्रश्नावर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गत चार वर्षांपूर्वी नवीन टाकीचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तो मंजूरदेखील करण्यात आला होता. परंतु दहा टक्के लोकवर्गणी ग्रामस्थांनी न भरल्यामुळे ती निविदा रद्द करण्यात आली. गेल्या आठवड्यात दुसरा प्रस्ताव नवीन चार टाक्यांचा आलेला आहे. या प्रस्तावानुसार तहसील कार्यालयाजवळील टाकी, काळे मळा, शिवाजीनगर, मागासवर्गीय वस्ती येथील नवीन टाकी प्रस्ताव सादर केला आहे. या नवीन टाक्यांचा प्रस्ताव प्रलंबित आहे.-डी. ए. भोसलेग्रामविकास अधिकारी, वडूजवडूजमधील धोकादायक असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ ग्रामपंचायतीने प्रवेश बंद बाबत फलक लावला असलातरी त्याकडे नागरिक व वाहनधारक दूर्लक्ष करीत आहेत. या टाकीजवळून शेकडोच्या संख्येने दररोज नागरिक व वाहनधारक जात आहेत. या फलकावर काही अपघात झाल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट केलेले आहे. याचा कुठेतरी विचार होण्याची आवश्यकता आहे.
टाकी बनतेय कर्दनकाळ !
By admin | Updated: November 11, 2014 00:04 IST