सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इतर साथरोग पूर्णत: नियंत्रणात आले. दरवर्षी शहरात डेंग्यूचे सुमारे ३०० ते ५०० रुग्ण आढळून यायचे. यंदा हा आकडा केवळ ९९ इतकाच आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेनेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग, चिकुनगुन्या या आजारांचे रुग्ण आढळून येतात. या आजारांवर प्रतिबंध आणण्यासाठी जिल्हा हिवताप विभाग, सातारा पालिका व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ठोस कार्यवाही केली जाते. आरोग्य पथकांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे अशा रुग्णांचा शोध घेतला जातो. यंदा सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातल्याने सर्वच साथरोग नियंत्रणात आले.
जिल्ह्यासह शहरात दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. हा आकडा पाचशेच्या घरात जायचा. यंदा मात्र शहरात डेंग्यूचे केवळ ९९ रुग्ण आढळून आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या अत्यंक कमी असल्याने आरोग्य विभागाची चिंताही कमी झाली आहे.
(चौकट)
कुठल्या वर्षात किती पेशंट
२०१६ - ३२५
२०१७ - ३७२
२०१८ - ४०३
२०१९ - ४५०
२०२० - ९९
(चौकट)
डेंग्यूची लक्षणे
- एडिस इजिप्ती डास चावल्याने डेंग्यूचा संसर्ग होतो. या डासांची उत्पत्ती घर व परिसरातील भांडी, पाण्याची डबकी, टाक्या, भंगार साहित्य आदींमध्ये होते.
- डेंग्यूच्या तापाची लक्षणे इतर तापांच्या लक्षणासारखीच असतात.
- ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी अशी या आजाराची लक्षणे आहेत.
- शिवाय भूक मंदावणे, पोटदुखी, मळमळणे अशी लक्षणेही दिसून येतात.
- डेंग्यू कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो.
(चौकट)
प्रशासनाकडून गृहभेटीद्वारे सर्व्हे
जिल्हा परिषद व हिवताप विभागाकडून दरवर्षी डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग चिकुनगुन्या अशा आजारांचा गृहभेटीद्वारे सर्व्हे केला जातो. प्रत्येक घराला भेट देऊन येथील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. जिल्ह्यात सुमारे ३५० आरोग्य सेवकांकडून हे काम केले जात आहे. आजाराची माहिती घेणे, पाण्याचे कंटेनर तपासणे, डेंग्यूच्या अळ्या शोधून त्या नष्ट करणे, अत्यावश्यक ठिकाणी औषध फवारणी करणे, अशी कामे सर्व्हेमार्फत केली जातात. यंदा डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण हळूहळू आढळून येऊ लागल्याने सर्व्हेचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे.