कऱ्हाड : देशातील आरोग्य सेवा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आँको-लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत असलेल्या अद्ययावत कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, सह्याद्री हॉस्पिटल्स समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. चारूदत्त आपटे, उपाध्यक्ष केतन आपटे, संचालक सदानंद बापट, आँको-लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष उदय देशमुख, संचालक प्रताप राजेमहाडिक, सचिन देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सह्याद्रीचे संचालक दिलीप चव्हाण, अमित चव्हाण, भालचंद्र चव्हाण, मुख्य व्यवस्थापक डॉ. व्यंकटेश मुळे, मुख्य वित्तीय अधिकारी राजेंद्र सदुंबरेकर, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष संगीता साळुंखे, डॉ. प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, महामारीसारख्या आव्हानात्मक काळात आपण सर्वांनीच एकत्र येऊन काम केले आहे. मात्र, देशातील लोकसंख्या लक्षात घेता आरोग्यसेवा यंत्रणेत जास्तीत जास्त गुंतवणूक होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण एकत्रपणे प्रयत्न करायला हवेत. सह्याद्री हॉस्पिटल आणि आँको-लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणारे हे कॅन्सर उपचार सेंटर, हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. याचा फायदा कऱ्हाड व आसपासच्या परिसरातील सामान्य जनतेला होणार आहे.
सह्याद्री हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. चारूदत्त आपटे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन काम केले. जर आपल्याला सार्वत्रिक आरोग्यसेवा साध्य करायची असेल तर वेगवेगळे काम न करता कोरोनानंतरच्या काळातदेखील एकत्र येऊन काम केले पाहिजे.
आँको-लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष उदय देशमुख, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक दिलीप चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. व्यंकटेश मुळे यांनी स्वागत केले तर अमित चव्हाण यांनी आभार मानले.
- चौकट
उद्घाटनाच्या पूर्वसंध्येलाच रेडिएशन उपचार सुरू!
तातडीची रेडिएशन उपचार पध्दतीची गरज असलेल्या एका रूग्णावर उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला रेडिएशन उपचार करण्यात आले. हे उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात आले. या रूग्णाच्या कुटुंबीयांचादेखील सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटनावेळी करण्यात आला.
फोटो : १९ केआरडी ०३
कॅप्शन : कऱ्हाड येथे सह्याद्री हॉस्पिटल व आँको-लाईफ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या कर्करोग उपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनोगत व्यक्त केले.