चाफळ : चाफळ गावात जाण्यासाठी उत्तरमांड नदीवर असलेला जुना फरशी पूल पाडून त्याठिकाणी नवीन फरशी पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी ‘नाबार्ड’मधून सुमारे १ कोटींचा निधी मंजूर केला आहे. चाफळ येथे ३५ वर्षांपूर्वीचा असलेला जुना फरशी पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. उंचीने कमी असलेल्या या फरशी पुलाला दोन्ही बाजूने कसलेच संरक्षक कठडेही नव्हते. त्यामुळे अनेकदा याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडले होते. ही गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेता, शंभुराज देसाई यांनी या पुलाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामपंचायत व गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना याबाबतचा पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पाठपुरावा झाल्याने देसाई यांनी तत्काळ नाबार्डमधून या पुलाच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला.
या पुलाच्या कामाचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील, चेअरमन राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच उमेश पवार, भरत साळुंखे, चंद्रकांत पाटील, पुरुषोत्तम पाटील, अभिजित पाटील, शिवानंद वेल्हाळ, अभिजित वेल्हाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या पुलामुळे चाफळसह यामार्गे जाधववाडी, जंगलवाडी, माथनेवाडी, चव्हाणवाडी या गावांना जाणाऱ्या नागरिकांचीही चांगली सोय होणार आहे.