कुडाळ : शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी शिक्षक संघांमध्ये मनोमिलन झाले. मनोमिलनानुसार एकत्र लढलेल्या दोन्ही संघांची बँकेत सत्तादेखील आली. मात्र, शेवटी अध्यक्ष-उपाध्यक्षपद निवडणुकीत दोन्ही संघांत भांडण झाले. अखेर संभाजीराव थोरात गटाने शिवाजीराव पाटील गटाचे तीन संचालक फोडून अध्यक्षपदी बळवंत पाटील तर उपाध्यक्षपदी मोहन निकम यांची वर्णी लावण्यात यश मिळविले.शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्तेच्या दृष्टीने निर्णायक भूमिका बजावणाऱ्या माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाला संभाजीराव थोरात गटाने बरोबर घेतले. दोन्ही संघांत मनोमिलन झाले. त्यानुसार पाटील गटाचे सात तर थोरात गटाचे दहा उमेदवार निवडून आले. सत्ता मिळवण्यासाठीच हे मनोमिलन संभाजीराव थोरात गटाने केले असल्याचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी स्पष्ट झाले. या निवडीत शिवाजीराव पाटील गटाला विश्वासात न घेता त्यांच्या गटाचे तीन संचालक फोडण्यात आले. त्यामुळे पाटील गट एकाकी पडला. तरीदेखील पाटीलप्रणित संघाने स्वाभिमान जपत राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम यांचा अध्यक्षपदासाठी तर महेंद्र अवघडे यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करून विरोध दर्शविला. संभाजीराव थोरात गटाकडून अध्यक्षपदासाठी बळवंत पाटील यांचा तर उपाध्यक्षपदासाठी मोहन निकम यांचा अर्ज दाखल करण्यात आला. शिक्षक समितीकडून अध्यक्षपदासाठी चंद्रकांत मोरे, उपाध्यक्षपदासाठी किरण यादव यांचा अर्ज दाखल झाला. मात्र, शिक्षक समितीने शेवटी शिवाजीराव पाटील गटाला सहकार्य करण्याचे ठरवल्यामुळे गुप्त मतदान झाले. त्यामध्ये शिवाजीराव पाटीलप्रणित संघाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुकाराम कदम यांना ८ मते, उपाध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र अवघडे यांनाही ८ मते मिळाली. संभाजीराव थोरात गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बळवंत पाटील यांना १३ तर उपाध्यक्षपदाचे उमेदवार मोहन निकम यांनाही १३ मते मिळाली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी अध्यक्षपदी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी निकम यांची निवड झाल्याचे घोषित केले.दरम्यान, या निवडीनंतर थोरात गटाच्या शिक्षक समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून जल्लोष केला. (प्रतिनिधी)मनोमिलन शिल्पकारांचा पराभव...शिक्षक बँक निवडणुकीत शिवाजीराव पाटील गटाला आपल्याबरोबर घेण्यासाठी थोरात गटाकडून तसेच शिक्षक समितीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, थोरात गटाबरोबर जाऊन संघात मनोमिलन घडवणारे खरे शिल्पकार हे तुकाराम कदम होते. परंतु त्यांनाच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.निवडणूक चुरशीची ठरली...शिक्षक बँकेची निवडणूक काही दिवसांपूर्वीच झाली. या निवडणुकीत एकमेकांवर जोरदार आरोप करण्यात आले होते. त्यातच दोन्ही शिक्षक संघ एकत्र आल्याने निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट होते. अखेर निवडणुकीत मनोमिलन झालेल्या संघाने वर्चस्व मिळविले.
एकत्र लढले ; मात्र पदासाठी भांडले !
By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST