मलकापूर : गेल्या आठ दिवसांपासून दगडांचा वर्षाव करीत कापीलसह आसपासच्या गावात चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे. अशातच रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पाचवड येथे उसाच्या फडात लपून बसलेल्या तीन संशयितांना ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. यावेळी दाट उसाचा फायदा घेत इतर तिघे पसार झाले. ग्रामस्थांनी पकडलेल्या तिघांना कऱ्हाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत पोलीस कसून चौकशी करीत होते.दरम्यान, चोरटे सापडले असल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. कापील-गोळेश्वर, धोंडेवाडी, काले, आटके, पाचवड परिसर व कापीलचे दहा मळे या भागात गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी घरांवर दगडांचा वर्षाव करणे, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून शेतात काम करणाऱ्यांना भीती दाखविणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ रात्रभर जागरण करून गस्त घालीत आहेत. काही शेतमजूर महिलांना संबंधित चोरट्यांनी दमदाटीही केली होती. त्यामुळे परिसरात आणखीनच दहशत निर्माण झाली. (प्रतिनिधी) धोंडेवाडीत चंदनाच्या झाडाची चौकशी... धोंडेवाडी येथील लक्ष्मण शेडगे यांची ‘मळा’ नावाच्या शिवारात वस्ती आहे. ते शुक्रवारी सकाळी ६ वाजता जनावरांना वैरण पाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वस्तीच्या शेडमध्ये पाच ते सहा अनोळखी व्यक्ती बसल्याचे शेडगे यांच्या निदर्शनास आले. ‘तुम्ही कोण, इथे शेडमध्ये काय करताय,’ असे शेडगे यांनी विचारले असता, ‘तू एवढ्या लवकर कसा आलास,’ असा प्रतिप्रश्न करून आम्ही चंदन चोरण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले होते.‘ते’ तिघे चोरटे नाहीत !चोप दिलेले तिघेजण चोर नसल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे. संबंधित तिघेही अल्पवयीन मुले आहेत. मिरज येथील झोपडपट्टीत ते वास्तव्यास असून मनी आणि रूद्राक्ष विकण्याचा ते व्यवसाय करतात. रविवारी ते रेल्वेने कऱ्हाडला आले होते. त्यानंतर मनी व रूद्राक्ष विकत पायी चालत ते इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते.
उसाच्या फडात लपलेल्या तिघांना चोप
By admin | Updated: July 6, 2015 00:24 IST