शिरवळ : येथील जुन्या औद्योगिक वसाहतीतील एका रसायननिर्मितीच्या कंपनीला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये ३५ ते ४० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग एवढी भीषण होती की, शेजारच्या कंपनीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. नऊ अग्निशमन बंब, सात खासगी टँकरच्या मदतीने दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविता आले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत सुभाष सिपी यांच्या मालकीची सिपी पॉलिमुरेमिन्स ही रंगांची रसायने तयार करणारी कंपनी आहे. कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या बॅरलच्या गोदामाला गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले.मात्र, गोदामामध्ये मोठा साठा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. कंपनीत ठेवलेल्या बॅरलचे स्फोट होऊ लागले. स्फोटांमुळे बॅरल आकाशात उंच फेकले जात होते. त्यामुळे त्यांचे अवशेष घटनास्थळापासून एक ते दोन किलोमीटरपर्यंत जाऊन पडत होते. आगीची माहिती मिळताच शिरवळ व खंडाळ्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खंडाळा मदत पथकाच्या मदतीने परिसरातील इतर कंपनीतील कामगारांना बाहेर काढत परिसर निर्मनुष्य केला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, तहसीलदार शिवाजी तळपे घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीच कात्रज, पुणे येथील अग्निशमन बंब सर्वांत प्रथम दाखल झाला. त्यानंतर कोल्हापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, हिंजवडी औद्योगिक वसाहत, फलटण, सातारा, म्हसवड, सासवड येथील अग्निशमन दलांचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागले. रात्रीची वेळ व सोसाट्याचा वारा यामुळे आग भडकत होती. तसेच रसायनाच्या बॅरलचे स्फोट वाढत होते. त्यामुळे आग विझविताना अडचणी येत होत्या. बंबांसाठी इतर कंपन्यांनी त्यांच्याकडील मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिल्याने पहाटे सहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र, सातनंतर पुन्हा आग भडकू लागली. त्यानंतर सकाळी नऊला आग पूर्णपणे विझली. (प्रतिनिधी) अनेकांनी गाव सोडलेआगीचे लोळ पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दहा ते वीस किलोमीटरपर्यंत दिसत होते. यावेळी आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने शिरवळ व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांनी गाव सोडणे पसंत केले.आगीची तीव्रता मोठी असतानाही कंपनीच्या व्यवस्थापनातील अधिकारी, सुरक्षारक्षक अथवा मालक तेथे उपस्थित नव्हते. प्रशासनाला मदत करण्याऐवजी लांब थांबून पाहणेच त्यांनी पसंत केले. सुरक्षारक्षकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला.अग्निशमनच्या जवानांचे धाडसशेजारच्या कंपन्यांनाही आगीची झळ पोहोचत होती. तेथून जवळच असलेल्या कंपनीत डिझेलचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मोठा अनर्थ ओढावू शकला असता. मात्र, कात्रज व हिंजवडीच्या अग्निशमन दलातील जवानांनी आगीची झळ तिथंपर्यंत पोहोचू न देताच आग आटोक्यात आणली. दोषींवर कारवाई : जिल्हाधिकारीशिरवळ येथील कंपनीला लागलेल्या आगीबाबत वाईच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.श
शिरवळमध्ये रसायन कंपनीला आग
By admin | Updated: April 3, 2015 23:57 IST