कोळकी : ‘कोरोनानंतर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा,’ असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले.
गणेशोत्सव सण काही दिवसांवर आला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गणेशोत्सव सण साध्या पद्धतीने साजरा करावा. याबाबत विडणी येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सावंत म्हणाले, ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपती बसविण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त मोठी नसावी. गणेश मंडळाचा मंडप भपकेबाज न बांधता छोटा आणि साध्या पद्धतीचा उभारून मंडपाचे दैनंदिन निर्जंतूकीकरण करत राहावे. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय व स्वच्छतेबाबत शिबिराचे आयोजन करून जनजागृती करावी. भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रम करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करून गर्दी करू न देण्याची जबाबदारी मंडळाची राहील. ‘श्रीं’च्या आगमनाची व विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. कृत्रिम तलावात कमी लोकांत कमी वेळेत विसर्जन करण्यात यावे. विसर्जनस्थळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी जाणे टाळावे.’
यावेळी विडणी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली अभंग, माजी उपसरपंच अमोल नाळे यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ३१कोळकी
विडणी येथे आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना केल्या. यावेळी सरपंच रुपाली अभंग, माजी उपसरपंच अमोल नाळे उपस्थित होते. (छाया : संदीप कोरडे)