लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : परीक्षांशिवाय लागलेल्या निकालाने यंदाही मुलांवर गुणांचा पाऊस पाडला आहे. नव्वदहून अधिक टक्के मिळवणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेतून पदवी संपादन करावी, अशी मानसिकता दिसत आहे. सामायिक प्रवेश परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार आहे.
कोविडमुळे यंदाही परीक्षा न घेता मूल्यांकन करण्यात आले आहे. सरासरी काढून दिलेल्या या गुणांनी अनेक पालकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. अकरावी हे भविष्यातील करिअरचा पाया असल्याने प्रवेश घेताना मुलांच्या कलाकडे लक्ष देणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. नव्वद टक्के गुण मिळाले म्हणून शास्त्र शाखेत प्रवेश घेण्यापेक्षा त्यांची आवड आणि शिक्षणाची कुवत या दोन्ही बाबी तपासून मगच प्रवेश घेणे गरजेचे आहे. गुणांच्या आधाराने अकरावी प्रवेश झाला तरीही पुढं त्यात गती नाही मिळाली तर या विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागते, असे तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
केंद्रीय पद्धतीने प्रवेश देणं उपयुक्त
सातारा शहरात १७ आणि जिल्ह्यात १२९ महाविद्यालये आहेत. अकरावीसाठी प्रवेश घेताना आवश्यक असणारे माहितीपत्रक घेण्यापासून संबंधित महाविद्यालयांत जाऊन अर्ज करणं विद्यार्थ्यांना खर्चिक आणि श्रम वाढवणारे ठरत आहे. त्यामुळे सातारा शहरातील महाविद्यालयांनी कोल्हापूर शहराच्या धर्तीवर केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे मुलांना आर्थिक भुर्दंडही बसणार नाही.
पॉईंटर :
दहावी विद्यार्थी :
४० हजार १६६
अकरावी प्रवेश क्षमता : ५२६००
विज्ञान : १८८८०
वाणिज्य : ९८२०
कला : १९०६०
संयुक्त : ३६४०
व्यवसाय अभ्यासक्रम : १२००
विद्यार्थ्यांचा शाखांकडे कल
विज्ञान : ५३ टक्के
वाणिज्य : ३४ टक्के
कला : १३ टक्के
यंदाही कट ऑफ वाढणार
गुणांचा पाऊस पडल्याने यंदाही जिल्ह्यातील विविध नामांकित महाविद्यालयांमध्ये कट ऑफची यादी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कट ऑफच्या यादीत यंदा चार टक्क़्यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्वद ते ऐंशी टक़्के गुण मिळवणाऱ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळेल, याबाबत साशंकता आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाचे प्रवेश
राज्य शासनाच्या सूचननेसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, आता सीईटी रद्दचा मंगळवारी निर्णय झाल्याने राज्य शासनाने गेल्यावर्षीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याची सूचना केली आहे.
- राजेंद्र शेजवाळ, प्राचार्य, शास्त्री महाविद्यालय
दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकन पद्धतीमुळे जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने दहावी उत्तीर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत सीईटीच्या माध्यमातून पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू शकली असती. मात्र, आता चांगले टक्के असतानाही अपेक्षित महाविद्यालयातच प्रवेश मिळेल किंवा नाही, याची चिंता आहे.
-
सीईटी परीक्षेचा अभ्यास केला होता. मात्र, ती परीक्षा रद्द झाली आहे. ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, तेथील माहिती मिळवली आहे. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होताच, त्याठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी नोंदणी करणार आहे. मात्र ही प्रक्रिया लांबू नये, अशी अपेक्षा आहे.
-
..................