सातारा : सातारा तालुक्यातील ब्राह्मणवाडीतील महिला कुक्कुटपालनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत. येथील महिलांनी परसदारातच देशी कोंबडीपालनाचा प्रकल्प सुरू केल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागला आहे. देशी कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी आहे. याचा विचार करून सातारा जिल्ह्यात ब्राह्मणवाडी येथील परसबागेतील देशी कोंबडी पालनास चालना देण्याच्या दृष्टीने ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ तथा ‘आत्मा’ने सहकार्य केले आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी ब्राह्मणवाडी येथे अनुदानातून राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार केला आणि यामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिके यांचा समावेश केला. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून येथील महिलांना माण तालुक्यातील गोंदवले येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडी पालन प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानुसार महिलांनी प्रशिक्षण घेतले. एक दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल त्याचबरोबर निगा राखणे आणि प्रथमोपचार याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी २५ महिलांना प्रात्यक्षिक स्वरूपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची प्रत्येकी ५० पिले देण्याचे नियोजन केले. मात्र, सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत पिले लहान असल्यामुळे त्यांना मांजर, घार, कुत्रा यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेता संरक्षण म्हणून लोखंडी खुराड्यांची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. गावच्या कृषी सहायक रोहिणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी स्थानिक कारागिरांकून लोखंडी खुराडी तयार करून घेतली. या खुराड्यांसाठी सहभागी महिलांना प्रत्येकी २,८०० रुपये खर्च आला. लाभार्थी महिलांना दोन आठवडे वयाची व लसीकरण पूर्ण झालेली पिले १६ सप्टेंबर २०१३ रोजी देण्यात आली. त्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थीस २५ किलो खाद्य देण्यात आले. खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महिलांना स्थानिक पद्धतीने मका, गहू, ज्वारी, बाजरी याचा उपयोग करण्याबाबत सातारा पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी रूपाली अभंग यांनी मदत केली. या प्रकल्पात सहभागी झालेल्या २५ महिलांपैकी १० महिलांची बँक खाती तासगाव येथील बँकेत खाती उघडण्यात आली. यापैकी पाच महिला ऊसतोडणीसाठी बाहेर असल्यामुळे त्यांची खाती खोलता आली नाहीत. त्या गावात परत आल्यानंतर त्यांची खाती खोलण्यात येणार आहेत. महिलांनी योग्य कोंबडींच्या पिलांची आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे आणि ‘आत्मा’ तसेच कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग अधिकार्यांनी प्रकल्पस्थळी भेटी देऊन महिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तीन महिन्यांच्या कालावधीत पिलांचे सरासरी वजन दीड किलो झाले. या प्रकल्पास राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे त्यांनी महिलांच्या धाडसाचे आणि उपक्रमाचे कौतुक केले. जोडधंदा म्हणून देशी कोंबडीपालन प्रकल्प उत्तम आहे. यामुळे देशी कोंबड्याचे संगोपनदेखील होत आहे. ‘आत्मा’ने दिलेल्या सहकार्यामुळे खात्री पटली आणि महिलांचा आत्मविश्वास वाढला. परिणामी ब्राह्मणवाडीतील महिलांची आर्थिक सक्षमीकरण होण्यास अतिशय मोठी मदत झाली.
ब्राह्मणवाडी बनतेय देशी कोंबड्यांचे गाव परसबागेत उभारले
By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST