कराड : कत्तल करण्याच्या उद्देशाने गार्इंची वाहतूक करून एका गाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. रेणुका सातव यांनी मंगळवारी हा निकाल दिला.नियाज बेपारी व टेम्पो चालक बाळासाहेब लोंढे अशी आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभुमी अशी की, आरोपी नियाज बेपारी याने ८ जुलै २०१० रोजी १८ गाई खरेदी केल्या. त्या कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांचे पाय बांधून एका टेम्पोमध्ये कोंबल्या. टेम्पोचालक बाळासाहेब लोंढे हा गाईंनी भरलेला टेम्पो घेऊन कत्तलखान्याकडे निघाला होता. या प्रकाराची माहिती समजल्यावर शिवसैनिकांनी पाळत ठेवून हा टेम्पो अडवला. त्यांनी चालकाकडे चौकशी केल्यावर त्याने टेम्पो कत्तलखान्याकडे घेऊन निघाल्याची कबुली शिवसैनीकांना दिली. शिवसैनिकांनी या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यातील एक गाय मृत्यूमुखी पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाची फिर्याद संदीप उर्फ संजय मोहिते यांनी शहर पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा तपास हवालदार अर्जुन पाटील यांनी केला. संशयित आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संवंर्धन कायदा, प्राण्यांचा निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणे व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कऱ्हाड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.खटल्याची सुनावणी न्या. रेणुका सातव यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)दुसऱ्या खटल्यात दोघांना सक्तमजुरीदुसऱ्या एका खटल्यात तेरा गार्इंची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी नियाज बेपारी व टेम्पो चालक राज दळवी याना सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा न्या. रेणुका सातव यांनी सुनावली. नियाज बेपारी याने २५ जुलै २००९ रोजी तेरा गाई राज दळवी याच्या टेंपामध्ये पाय बांधून भरल्या होत्या.
गाईच्या मृत्यूप्रकरणी दोघांना सक्तमजुरी
By admin | Updated: December 23, 2014 23:46 IST