पुसेसावळी : उरमोडीच्या कालवा क्रमांक २५ मधून सांगली जिल्ह्याला पाणी नेण्यात येणार असून, यामुळे चोराडे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आज, शनिवारी कालव्याच्या भूमिपूजनप्रसंगी काळे झेंडे दाखवून दुकाळग्रस्तांनी आपला संताप प्रकट केला. चोराडे येथील शेतकरी नवनाथ पिसाळ, विजय पिसाळ, सुहास पिसाळ, मधुकर साळुंखे, नवनाथ पाटील, भैरू पिसाळ, प्रफुल्ल ओहाळ, शंकर साळुंखे, शिवाजी साळुंके, नथुराम सरावदे, आबासाहेब जंगम, अशोक शिंगाडे, आकाराम सरावचे यांच्यासह अनेकांच्या जमिनी कालव्याखाली जाणार आहेत. याला या शेतकऱ्यांचा विरोध आहे.चोराडे वितरिका क्रमांक दोनसाठी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या जमिनी पाटासाठी गेल्या आहेत. आता सांगलीकरांसाठी पुन्हा जमिनी जाणार आहेत. आधीच पुनर्वसित लोकांना जमिनी गेल्या असून, आता सांगलीकरांचा आमच्या हक्काच्या पाण्यावर डोळा आहे. आम्हा शेतकऱ्यांचा या कालव्यासाठी विरोध आहे. याठिकाणी आम्ही काम सुरू होऊ देणार नाही, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत काही शेतकऱ्यांनी ढाणेवाडी फाटा (जि. सांगली) येथील कार्यक्रमात काळे झेंडे दाखविले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. (वार्ताहर)
दुष्काळग्रस्तांनी दाखविले काळे झेंडे
By admin | Updated: August 17, 2014 00:24 IST