अरुण पवार - पाटण -- विविध कारणांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ज्या कोयना धरणाकडे नेहमी लागलेले असते, त्यावर लक्ष ठेवायला पूर्णवेळ अधिकारीच सध्या नाही. कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्यानंतर नव्या अभियंत्यांची नियुक्तीच झालेली नाही; त्यामुळे जुने कार्यकारी अभियंताच ‘तात्पुरता कार्यभार’ सांभाळत असून, पुणे आणि साताऱ्यात राहणाऱ्या उच्चपदस्थांकडून येणाऱ्या आदेशांवरच व्यवस्थापनाची सारी भिस्त आहे. कोयना धरणात सध्या ‘उदंड जाहले पाणी’ अशी समाधानकारक स्थिती आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर यावर्षी धरण भरणार की नाही, अशी धास्ती सर्वांनाच लागली होती. बामणोली-तापोळा भागात तब्बल १५ वर्षांनंतर कोयनापात्रातून लोक चालत पलीकडे जाऊ शकत होते, एवढे पात्र कोरडे ठणठणीत पडले होते. तथापि, जुलैच्या मध्यापासून पावसाने जोर धरला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आसपासच्या डोंगरांवरून पाण्याचा येवा धबधब्यासारखा सुरू असून, नव्वद टक्क्यांहून अधिक भरलेले धरण आता कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरेल.देशातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आणि ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाकडे पाण्याची आणि विजेची चिंता मिटविणारे धरण म्हणून जसे पाहिले जाते, तसेच त्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे उद््भवणाऱ्या पूरस्थितीमुळेही नदीकाठची गावे आणि शहरांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांचे लक्ष धरणाकडे नेहमी असते. सांगली जिल्ह्यापर्यंतच नव्हे, तर कर्नाटकातील अनेक गावांपर्यंत या पूरस्थितीचे पडसाद पोहोचतात. सध्या कोयना धरणातील पाण्याची चिंता मिटली असली, तरी धरणाची जबाबदारी सांभाळणारे व्यवस्थापनच ‘कार्यभारित’ आहे. मुख्य अभियंता पुण्याला, अधीक्षक अभियंता साताऱ्याला, तर कार्यकारी आणि उपकार्यकारी अधिकाऱ्यांची झाली आहे बदली. त्यांच्या जागी नवे अधिकारी नियुक्त न केल्याने मावळते कार्यकारी अभियंताच ‘कार्यभार’ सांभाळत आहेत.जलसंपदा विभागाने कोयना व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. मुख्य अभियंता दीपक मोडक यांचे कार्यालय पुणे येथे आहे. नव्यानेच नेमणूक झालेले अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांचे कार्यालय साताऱ्याला आहे. त्यामुळे हे वरिष्ठ अधिकारी कोयनेचा कारभार तेथूनच पाहतात. कोयना धरणाचा रोजचा आढावा व पाणीपातळीची माहिती घेतात. अधूनमधून धरणाला भेटीही देतात. मात्र, कोयना धरणाचे व्यवस्थापन पाहणारे कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन अधिकारी अजूनही आलेला नाही. त्यामुळे धरणे यांनाच कोयनेचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.धरणे यांच्याशी संपर्क साधायचा झाल्यास ते कधीही प्रतिसाद देत नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. विविध राजकीय व्यक्तींनी त्यांच्याबाबत यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. धरणे यांच्या अनुपस्थितीत कामकाज सांभाळणारे उपकार्यकारी अभियंता वसंत भोई यांचीही महिनाभरापूर्वी कोल्हापूर येथे बदली झाली आहे.
उदंड जाहले पाणी; पण राखायचे कुणी?
By admin | Updated: August 9, 2014 00:34 IST