तरडगाव : महापुरुषांच्या विचारसरणीचा गौरव विविध कार्यक्रमांतून होताना पाहावयास मिळतो. परंतु, सामाजातील काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तीकडून त्या विचारांना मूठमाती दिली जाते. अशीच सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी घटना काही दिवसांपूर्वी तरडगाव बसस्थानक परिसरात एकाच ठिकाणी दोन महापुरुषांच्या लावण्यात आलेल्या नामफलकावरून झालेल्या वादातून घडली. मात्र, त्यावर वेळीच तोडगा काढल्याने आणि ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रक्षाबंधन सणाच्या आदल्या रात्री एका समाजातील काही युवकांनी बसस्थानक परिसरात चौक म्हणून एका महापुरुषाच्या नावाचा फलक लावला. दुसऱ्या दिवशी ते फलक पाहिल्यावर दुसऱ्या समाजातील युवकांनी आक्षेपार्ह विधानासह दुसऱ्या महापुरुषाचा फलक समोरच लावला. त्यानंतर तणावाचे वातवरण निर्माण झाले.घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळताच त्यांनी येथे येऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. या घटनामुळे वातावरण जास्त चिघळले जाऊ नये. या उद्देशाने किंद्रे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्हीकडील व्यक्तींना ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र बोलवून सामोपचारातून वाद मिटविला. त्यानंतर दोन्ही फलक काढण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी एका गटाने बसस्थानक परिसराला आम्ही केलेल्या मागणीनुसार महापुरुषाचे नाव चौक म्हणून द्यावे, असे निवेदन ग्रामपंचायतीला दिले. त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही १९९९ साली त्या परिसराला ज्या महापुरुषाचे नाव दिले होते तेच कायम ठेवावे, असे निवेदन दुसऱ्या गटाकडून देण्यात आले.स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत दोन्ही निवेदनावर निर्णय घेतला जाणार असल्याचे निश्चित झाल्याने तोपर्यंत सहा दिवस दोन्ही समाजात तणावपूर्ण शांतता पसरली होती. सभेच्या दिवशी भरगच्च गर्दीने आजवरच्या ग्रामसभेतील उपस्थित संख्येचा विक्रम मोडीत काढला. अनेक विषयांवर चर्चा होऊन चौकाचा मुद्दा आल्यावर ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे यांनी दोन्ही अर्ज वाचून दाखविले.दोन्ही बाजूंकडून आपआपली भूमिका मांडली. बसस्थानकाचा परिसर हा चौपदरीकरणाच्या कामात जाणार आहे. यामुळे चौक उभारण्याचा निर्णय तुर्तास बाजूला ठेवावा. या विषयांमुळे दोन समाजात उगाचच तेढ निर्माण होत असल्याने कुणा एका महापुरुषाचे नाव त्या चौकाला देण्याचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका काही व्यक्तींनी मांडली. (वार्ताहर)
महापुरुषांच्या फलकांना चौकात बंदी
By admin | Updated: August 18, 2014 23:38 IST