लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. पण त्यामुळे होणाऱ्या आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या अँटासिडच्या गोळ्यांमुळे अल्सर आणि हार्नियाचा त्रास वाढत असल्याचे पुढे आले आहे. परिणामी जिभेवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात.
शरिरातील आम्लाचे प्रमाण वाढल्याने पोटाचा, आतड्यांचा अल्सर होण्याची भीती असते. चुकीच्या आहार पध्दती, तणाव, अपुरी झोप यामुळे अल्सर उद्भवू लागतो. तरुण वयात वाढता अल्सर चिंताजनक आहे.
बदलत्या जीवनशैलीने जेवणाच्या वेळा पाळणे अशक्य होत आहे. रोजच्या आहारात जंकफूड, अतितिखट, मसालेदार पदार्थांचा समावेश वाढत आहे. परिणामी अनेकांना अल्सरच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. अल्सर ही एकप्रकारची जखम आहे. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात होतात. औषधांनी अल्सर बरा होतो. त्यात गुंतागुंत झाली, तर शस्त्रक्रियाही करावी लागते.
१) काय आहेत लक्षणे
जळजळणे
पोट दुखणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
मळमळणे
वजनात अचानक घट होणे
दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसणे
उलटीतून रक्त पडणे
२) काय काळजी घेणार
वेळेवर जेवण, कमी प्रमाणातील तिखट, अत्यावश्यक असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळ्या घेतल्या पाहिजेत.
तिखट, मसालेदार, खारट, लोणची, पापड, फास्टफूट शक्यतो टाळलेला बरा
दूषित अन्न, उघड्यावरील व कच्चे अन्नपदार्थ खाऊ नयेत
रोज ग्लासभर दूध आहारात घ्यावे
नियमित दही खावे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा
उपाशीपोटी फार वेळ राहू नये, जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात.
३) पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा (दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रिया)
कोट : १
अल्सरची अनेक कारणे आहेत. त्यातील अतितिखट, मसालेदार पदार्थ खाणे, अवेळी जेवणे आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. दूषित पाणी हेही त्याचे कारण आहे. अल्सरला दूर ठेवायचे असेल, तर त्यासाठी शरीरात आम्ल वाढविणारे पदार्थ न खाता पौष्टिक पदार्थ खावेत. जागरण आणि ताण दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
- डॉ. संदीप श्रोत्री, पोटविकारतज्ज्ञ, सातारा
गॅस्ट्रिक अल्सर हा पोटाचा विकार आहे. यात मोठ्या प्रमाणावर होणारी ॲसिडिटी, पित्ताचा त्रास, चहाचे, मद्याचे अतिप्रमाण, जागरण ही अनेक कारणे आहेत. त्यामुळे अल्सरला दूर ठेवण्यासाठी तणाव दूर ठेवणे, जागरण टाळणे, जेवणातील अनियमितता याबरोबरच हलका पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रतापराव गोळे, पोटविकारतज्ज्ञ, सातारा