सातारा : दुष्काळामुळे सणांवर जणू संक्रांत आली आहे. माणसासह पशु-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजगार नसल्यामुळे पैशांची चणचण आहे, अशा टंचाईच्या काळात शुक्रवारी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. दुष्काळानं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं असताना साखरगाठींचा दर न वाढविण्याचा निर्णय साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे दुष्काळातही साखरगाठींनी गोडवा वाढविल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गुढीपाडव्यापासून मराठी वर्षारंभ होतो. हा दिवस सर्वत्र गुढ्या उभारून उत्साहाने साजरा केला जातो. गुढीला बांधल्या जाणाऱ्या साखरगाठींना या दिवशी मोठे महत्त्व असते. यंदा साखर आणि मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील काही व्यावसायिकांनी साखरगाठींचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजारात सध्या रंगबेरंगी साखरगाठींची रेलचेल पाहायला मिळत आहे. साधारणपणे चार रंगांमध्ये तयार केलेल्या साखरगाठींना पसंती असल्याचे दिसत आहे. यामध्ये पिवळा, केशरी, गुलाबी आणि पांढरा या चार रंगांचा समावेश आहे. शिवाय बिस्कीट गाठी, पिंपळ पानाच्या आकारातील, चंपाकळी आकारातील गाठींचा समावेश आहे. साखरेच्या पाकापासून साखरगाठी बनविल्या जातात. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे महाशिवरात्रीपासूनच या कामाला सुरुवात केली जाते. दुष्काळामुळे आम्ही व्यावसायिकांनी साखरगाठींच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे व्यावसायिक शेखर राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) आकार, वजनावरून ठरते किंमत मागणीनुसार ५० ग्रॅमपासून ते ५ किलोपर्यंत वजनाच्या साखरगाठी बाजारात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील काही हौशी ग्राहक आरसे, भिंग, रेबीन अशा वस्तूंनी शोभिवंत केलेल्या साखरगाठींची मागणी करत आहेत. तर देवळात लावण्यासाठी मोठ्या आकाराच्या साखरगाठींमध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे छाप उमटविलेल्या गाठींनाही मोठी मागणी आहे. आकार, वजन आणि कलाकुसर यानुसार साखरगाठींचे वेगवेगळे दर आहेत. अगदी पंधरा रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत किमतीच्या साखरगाठी सध्या बाजारात विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत.
ऐन दुष्काळातही साखरगाठींचा गोडवा!
By admin | Updated: April 7, 2016 23:49 IST