सातारा : गॅस सिलिंडरचा दर वाढत चालला असून, टाकी हजाराच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच सिलिंडर घरपोच करणारा डिलिव्हरी बॉय पावतीपेक्षा अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी असतात; पण दुखवायचे नाही म्हणून ग्राहकही मागणीप्रमाणे पैसे देतात. यातून त्यांची चंगळच होत आहे.
मागील सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. यामुळे अनेकांची नोकरी गेली. कामे मिळविताना अडचणी येत आहेत. अशातच वर्षभरात इंधन आणि गॅस सिलिंडरचे दर वाढत चालले आहेत. यामुळे महागाईची फोडणी अधिकच बसत चालली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना अधिक बसत आहे.
घरगुती गॅसच्या किमती सतत वाढत चालल्या आहेत. मागील महिन्यात २५ रुपयांनी सिलिंडर टाकीचा दर वाढला होता. त्यामुळे टाकी ८६५ रुपयांना झाली, तर आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा टाकीमागे २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी सिलिंडरचा दर ८९० रुपयांवर पोहोचलाय. साधारणपणे पाच माणसांच्या एका कुटुंबाला महिन्याला एक टाकी लागते. यावरून दर महिन्याला ९०० रुपये मोजण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. गॅसची ही दरवाढ सर्वसामान्यांचे दिवाळे काढणारी ठरली आहे.
............................
चौकट :
सध्या गॅस सिलिंडरचा दर ८९०
सातारा शहरातील ग्राहक ८००००
......................................
डिलिव्हरी बॉयला वेगळे १०-२० रुपये कशासाठी?
आम्हाला दर महिन्याला सिलिंडरची टाकी लागते. डिलिव्हरी बॉय टाकी घरात आणून देतो; पण तो अनेक वेळा पावती देत नाही. तो सांगतो त्याप्रमाणे टाकीचे पैसे देतो. त्याला दुखवायचे नाही म्हणून आम्ही पावतीची विचारणा करीत नाही.
- केशव पाटील, ग्राहक
..............................................
सिलिंडर देणारे पावतीपेक्षा अधिक १०-२० रुपये घेतात हे माहीत असते; पण दुखावले तर पुढीलवेळी टाकी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पावती न घेताही मागणीप्रमाणे पैसे देते. यामागील भावना हीच असते की वेळेवर टाकी मिळावी.
- कलावती यादव, गृहिणी
..................................................
नऊ महिन्यांत ३०० रुपयांची वाढ...
मागील नऊ महिन्यांचा विचार करता घरगुती सिलिंडर टाकीचा दर ५९९ वरून ८९० रुपयांवर पोहोचलाय. डिसेंबर २०२० मध्ये टाकीचा दर १०० ने वाढून ६९९ रुपये झाला. त्यानंतर फेब्रुवारीत ७९९, एप्रिल महिन्यात ८१४, तर जुलैमध्ये ८३९ रुपये झाला. त्यानंतर दोन वेळा दरवाढ झाली. त्यामुळे सध्या घरगुती सिलिंडर टाकीचा दर ८९० रुपयांवर पोहोचला आहे.
...........................................
पावतीप्रमाणे पैसे द्यावेत...
ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर टाकी द्यावी लागते. त्यासाठी कोणताही वेगळा चार्ज आकारला जात नाही; पण डिलिव्हरी बॉयने जादा पैसे मागितले तर त्याच्याकडे प्रथम सिलिंडरची पावती मागावी. त्याप्रमाणेच त्याला पैसे द्यावेत. तरीही त्याने ऐकले नाही तर सिलिंडर कंपनीच्या वितरकांशी संपर्क साधावा, असे एका वितरकाने सांगितले.
............................................