कोपर्डे हवेली : परिसरात बुधवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत असून अनेक ठिकणच्या क्षेत्रामध्ये पाणी साठून राहिले असल्याने टोकणीची कामे थांबली आहेत. तसेच मशागतही ठप्प झाली आहे.
शामगावला दिलासा
शामगाव : गत दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे कऱ्हाड उत्तरमधील पूर्वेकडील विभागात पेरणीची धांदल उडाली आहे. पेरणी झालेल्या पिकास हा पाऊस अनुकूल आहे. सोयाबीन, घेवडा, मका, उडीद, आदी पिकांची पेरणी झाली असल्याने हा पाऊस पूरक ठरत आहे.
घरोघरी जनजागृती
कऱ्हाड : शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील महिलांसह स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातील स्वच्छतादूत यांच्याकडून घरोघरी जाऊन महिलांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले जात आहे. ओला व सुका कचरा कसा साठवावा, त्याचे कशाप्रकारे फायदे आहेत, अशी विविध माहिती महिला कर्मचारी यांच्याकडून दिली जात आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव
सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकाविण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. वन विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याची दुरवस्था
कऱ्हाड : विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रवासी शेडची मागणी
कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड-पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एसटी थांबा प्रवासी शेड हटविलेले आहेत. पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एसटी गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवासी शेड हटविलेले आहेत अशा ठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तलाव फुल्ल
कऱ्हाड : मान्सूनच्या सुरुवातीलाच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पाझर तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. शामगाव, घोगाव व मोठ्या तलावांसह लहान तलावातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तालुक्यात चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
उड्डाणपुलाची मागणी
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे वारंवार अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या लेनवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे.